या दोघांना का बोलवलं? प्रकाश राज आणि मेधा पाटकरांना पाहताच भाजप खासदार भडकले; म्हणाले, पाकिस्तानी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:28 IST2025-07-02T14:25:30+5:302025-07-02T14:28:09+5:30

संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत मेधा पाटकर आणि प्रकाश राज यांना बोलवण्यावरुन भाजप खासदारांनी गोंधळ घातला.

BJP MPs got angry after seeing Medha Patkar Prakash Raj in the parliamentary committee meeting walked out calling her traitor and Pakistani | या दोघांना का बोलवलं? प्रकाश राज आणि मेधा पाटकरांना पाहताच भाजप खासदार भडकले; म्हणाले, पाकिस्तानी...

या दोघांना का बोलवलं? प्रकाश राज आणि मेधा पाटकरांना पाहताच भाजप खासदार भडकले; म्हणाले, पाकिस्तानी...

BJP MP on Parliamentary Committee Meeting: ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि अभिनेते प्रकाश राज यांना बोलवण्यावरुन मोठा गोंधळ झाला. या बैठकीत सत्ताधारी भाजप खासदारांनी मेधा पाटकर आणि प्रकाश राज यांना पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला. दोघांनाही पाहून भाजप खासदारांनी गोंधळ घालता आणि बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर बैठक तहकूब करण्यात आली. ही बैठक भूसंपादन कायद्यांतर्गत योग्य भरपाई, पारदर्शकता, पुनर्वसन आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका यांच्या अध्यक्षतेलीखालील बैठकीत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. प्रकाश राज आणि मेधा पाटकर यांना बैठकीत पाहून भाजप खासदारांनी गोंधळ घातल्याने संसदीय समितीने अचानक समितीची बैठक संपवली. मेधा पाटकर यांची बाजू ऐकण्याच्या समितीच्या निर्णयाला भाजप खासदारांनी उघडपणे विरोध केला. जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसनात योग्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कायदा २०१३ च्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

समितीचे अध्यक्ष आणि ओडिशाचे काँग्रेस खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी समितीसमोर बोलावलेल्या साक्षीदारांबद्दल योग्य माहिती दिली नाही असा आरोप भाजप खासदारांनी केली. तर दुसरीकडे, लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच साक्षीदारांना बोलावले होते, असं स्पष्टीकरण उलाका यांनी दिलं. बैठकीसाठी मेधा पाटकर आणि प्रकाश राज यांच्यासह सुमारे १० सामाजिक कार्यकर्त्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र भाजप खासदारांनी मेधा पाटकर यांनी पर्यावरणीय कार्याच्या नावाखाली त्यांनी अनेक राज्यांमध्ये विकास कामे रोखल्याचा आरोप केला. 

भाजप खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी मेधा पाटकर यांना बोलवल्याने तीव्र आक्षेप घेतला. भाजपला भडकवण्याच्या उद्देशाने या लोकांना बोलावण्यात आले होते. जर मेधा पाटकर आणि प्रकाशराज सारख्या लोकांना संसदीय समितीसमोर साक्ष देण्यासाठी बोलावले जात असेल तर मग तुम्ही पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलवत नाही?, अशीही टीका एका खासदाराने केली. यानंतर, पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या इतर खासदारांनीही बैठकीतून सभात्याग केला.

दरम्यान, मेधा पाटकर यांनी पर्यावरणीय मुद्द्यांच्या नावाखाली देशाच्या विकास आणि हिताच्या विरोधात काम केल्याचा भाजपचा आरोप आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असताना मेधा पाटकर यांनी सरदार सरोवर धरण प्रकल्पाला विरोध केला होता. गुजरात सरकारच्या सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरुद्ध मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन उभारलं होतं.

Web Title: BJP MPs got angry after seeing Medha Patkar Prakash Raj in the parliamentary committee meeting walked out calling her traitor and Pakistani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.