“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 20:03 IST2025-12-04T20:02:40+5:302025-12-04T20:03:48+5:30
BJP Replied Rahul Gandhi: परदेशी पाहुणे आल्यावर विरोधी पक्षनेत्याची भेट न होण्याबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
BJP Replied Rahul Gandhi: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारतात आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचे एअरपोर्टवर जाऊन स्वागत केले. भारत आणि रशियाच्या २३ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन भारत भेटीवर आले आहेत. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुतिन यांच्यासोबतची भेट नाकारल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, राहुल गांधी यांची विधाने बेजबाबदारपणाची असल्याचे म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोप केले. परंपरेनुसार कोणताही विदेशी पाहुणा भारतात आल्यावर विरोधी पक्षनेत्यालाही भेटतो. पण आता सरकार त्यांना जाणूनबुजून सांगते की, आमच्याशी भेटू नये. फक्त सरकारच नाही, आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो. अटल बिहारी वाजपेयींपासून ते मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत ही परंपरा पाळली जात होती. मात्र, सध्याचे सरकार असुरक्षिततेच्या भावनेतून अशी भेट होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. याला भाजपा नेते आणि खासदार संबित पात्रा यांनी उत्तर दिले.
भारत सरकारला असुरक्षित का वाटेल?
भाजपा खासदार संबित पात्रा म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहेत. ते तथ्यांवर आधारित नाहीत. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे विधान केले, ते केवळ चुकीचेच नाही, तर त्यामुळे भारताची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे मला वाटते. भारत सरकारला असुरक्षित का वाटेल? आज भारत जगातील एक आर्थिक आधारस्तंभ आहे. आपल्या देशाचे अशा प्रकारे मूल्यांकन करणे योग्य नाही, विशेषतः जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष भेट देणार आहेत. एक गोष्ट सर्वांना स्पष्टपणे माहिती असली पाहिजे की, जेव्हा परदेशी शिष्टमंडळ भारतात येते, तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांशी आणि सरकारशी बैठका आयोजित करण्याची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाची असते. इतर अधिकाऱ्यांशी आणि लोकांशी सौजन्यपूर्ण भेटींबद्दल, परदेशी शिष्टमंडळ कोणाला भेटायचे हे ठरवते. ते ठरवतात; सरकार हस्तक्षेप करत नाही, असे संबित पात्रा यांनी सांगितले.
दरम्यान, हे खूप विचित्र आहे. एक प्रोटोकॉल आहे की, परदेशी पाहुणे, मान्यवर विरोधी पक्षनेत्याला भेटतात. सरकार या प्रोटोकॉलचे उल्लंघन करत आहे. त्यांना इतर कोणाचे मत ऐकायचे नाही. लोकशाहीच्या प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. त्यांना कशाची भीती वाटते, ते देवालाच ठाऊक. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. हा प्रोटोकॉल मोडून त्यांना काय मिळणार आहे? ही त्यांची असुरक्षितता आहे. जगात लोकशाहीची प्रतिमा मलिन झाली आहे, या शब्दांत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका केली.