“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:36 IST2025-10-04T18:34:03+5:302025-10-04T18:36:31+5:30
BJP MP Nishikant Dubey: सोरोस फाउंडेशन आणि राहुल गांधी यांची भाषा एकसारखी आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
BJP MP Nishikant Dubey:काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागायला हवी. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजनैतिक पासपोर्ट जप्त करावा आणि राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करावी, अशी मागणी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केली. अलीकडेच राहुल गांधी यांनी कोलंबिया दौऱ्यादरम्यान भारत सरकारवर टीका केली होती. परदेशात जाऊन भारत सरकारवर टीका केल्यावरून भाजपा नेते राहुल गांधीवर निशाणा साधत आहेत.
सध्या भारतात लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. विविध परंपरांना वाव देणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही. हुकूमशाही पद्धतीने देश चालवू शकत नाही. चीनच्या तुलनेत भारताची रचना खूपच गुंतागुंतीची आहे. भारताची ताकद ही चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भारताला आध्यात्मिक परंपरा आणि विचारप्रणाली आहे. परंपरा आणि विचारशैलीच्या बाबतीत भारताकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे. मी माझ्या देशाबद्दल खूप आशावादी आहे. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. विविध कल्पना, परंपरा आणि धर्म यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी हवी असलेली मोकळीक सध्या देशात फारशी मिळताना दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
सोरोस फाउंडेशन आणि राहुल गांधी यांची भाषा एकसारखी
राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या संविधानाबद्दल लांबलचक भाषणे देतात. भारत सरकारविरुद्ध निराधार विधाने करतात. हे मलेशियातून झाकीर नाईक बोलण्यासारखे आहे, कॅनडा आणि अमेरिकेतून खलिस्तानी दहशतवादी पन्नूने बोलण्यासारखे आहे आणि पाकिस्तानातून सय्यद सलाहुद्दीनने बोलल्यासारखे आहे. त्यांच्या भाषेची तुलना सोरोस फाउंडेशनने समर्थित असलेल्या राहुल गांधींच्या भाषेशी केली तर ते एकसारखे आहेत, या शब्दांत दुबे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची व तेथील लोकशाहीची प्रतिमा मलिन करत आहेत. कधी ते भारतीय राज्यव्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याची भाषा करतात, तर कधी ते लष्कर, न्याययंत्रणा, संविधान, सनातन धर्म यांच्यावर टीका करतात.