“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:09 IST2025-07-19T15:09:18+5:302025-07-19T15:09:54+5:30
BJP MP Manoj Tiwari News: महाराष्ट्राची प्रांतीय एकात्मता आहे, भाषिक ऐक्य, बंधूभाव तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे, अशी टीका भाजपा खासदाराने केली आहे.

“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
BJP MP Manoj Tiwari News: नगरसेवक, आमदार, खासदार आपलेच निवडून आणायचे. अमराठी मतदारसंघ बनवून हा सगळा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही खडकासारखे टणक राहा. प्रत्येकाशी मराठीतच बोला. तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका. भाजपाचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे. समुद्रात बुडवून बुडवून मारू. हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल, तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील जाहीर सभेत दिले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप, चर्चा सुरू झाल्या आहेत. निशिकांत दुबे यांच्या जोडीला आता आणखी एका भाजपा खासदाराने या वादात उडी घेतली असून, राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मराठी भाषा, मराठी अस्मिता यांचे सर्वाधिक पालन भाजपाकडून केले जाते. मराठी संस्कृतीचा आदर जसा भाजपाकडून केला जातो, तसा कुणी करत नाही आणि करूही शकत नाही. राज ठाकरे मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत. या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकात्मता आहे, जे भाषिक ऐक्य आहे, बंधूभाव आहे, ते तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे. त्यामुळे राज ठाकरेंना ज्याला जे बोलायचे आहे ते बोलावे; पण, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे, त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, असे विधान अभिनेते, भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी केले. मनोज तिवारी मीडियाशी बोलत होते.
राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल
राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत जे जातील, ते राजकारणातून संपतील, असा दावा मनोज तिवारी यांनी केला. भाजपा खासदार निशिकांत दुबे राज ठाकरे यांच्यावर टीका करत होते. यातच आता भाजपा खासदार मनोज तिवारी यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे, मनसे नेते, मनसैनिक यावर पलटवार करणार का आणि कसा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का?
मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? बॉम्बे महाराष्ट्राचा भाग नव्हता, तो गुजरातचा भाग होता. १९५६ मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. परंतु आजही मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ ३१-३२ टक्केच लोक मराठी भाषिक आहेत. तितकेच ३२ टक्के हिंदी भाषिक आहेत. २ टक्के भोजपुरी, १२ टक्के गुजराती, ३ टक्के तेलगु, २ टक्के तामिळ, २ टक्के राजस्थानी, ११-१२ टक्के लोक ऊर्दू भाषिक आहेत, असे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचे आव्हान एका दुबेला नाही, तर भारतीय जनता पक्षाला आहे. दुबे हा भारतीय जनता पक्षाचा पुढारी आणि खासदार आहे. या दुबेचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसला नाही. नाराजी काय व्यक्त करत आहात, शेंबूड पुसल्यासारखे, तुम्ही मराठी-मराठी बोलत आहात. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो. महाराष्ट्राला आव्हान देतो. मराठी माणसाला मारण्याची भाषा करतो आणि हे भाजपा आणि मिंधे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत. राज ठाकरे काय चुकीचे बोलले? आमचेही मत तेच आहे. म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले, त्या विषयावर शंभर टक्के आम्ही एकत्र आहोत, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.