"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:21 IST2025-11-05T10:20:38+5:302025-11-05T10:21:06+5:30
भाजपा खासदार देवेंद्र सिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला.

"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समिती (दिशा) च्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. अकबरपूरचे भाजपा खासदार देवेंद्र सिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला. विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद आणि गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले.
भाजपा नेते आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांनी खासदार देवेंद्र सिंह भोले यांच्यावर दिशा समितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की, भोले यांनी त्यांच्याच काही लोकांना समितीचे सदस्य म्हणून जबरदस्तीने नियुक्त केले आहे, जे लोकांना टार्गेट करतात आणि अपमानित करतात, खोटे खटले दाखल करतात आणि कारखाना मालकांकडून पैसे उकळतात.
खासदार देवेंद्र सिंह भोले यांनी वारसी यांच्यावर वातावरण बिघडवण्याचा आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा आरोप केला. वाद आणि तुंबळ हाणामारी झाली. याच दरम्यान खासदार भोले म्हणाले, "माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही. मी कानपूर देहातचा सर्वात मोठा हिस्ट्रीशीटर आहे." परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केला.
दोन्ही प्रमुख नेत्यांमधील वाढत्या तणावामुळे विकासाच्या अजेंडावरील एक महत्त्वाची बैठक पुढे ढकलण्यात आली, ज्यामुळे जिल्ह्यात राजकीय तणाव आणखी वाढला. माजी खासदार वारसी हे योगी सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांचे पती आहेत. प्रतिभा शुक्ला यांनी काही महिन्यांपूर्वी राजकीय वर्चस्वाच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा मुद्दा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय होता.