भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:29 IST2025-12-26T17:26:59+5:302025-12-26T17:29:53+5:30
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या ब्राह्मण भोजनाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील कडाक्याच्या थंडीत भाजपाचे विधानसभा आणि विधान परिषदेमधील ४० आमदार या भोजनाला उपस्थित राहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आमदारांपैकी बहुतांश आमदार हे ब्राह्मण समाजातील होते.

भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय?
उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या ब्राह्मण भोजनाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील कडाक्याच्या थंडीत भाजपाचे विधानसभा आणि विधान परिषदेमधील ४० आमदार या भोजनाला उपस्थित राहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आमदारांपैकी बहुतांश आमदार हे ब्राह्मण समाजातील होते. तसेच अधिवेशन सुरू असतानाच विशिष्ट्य समाजाच्या आमदारांचा एक मोठा गट या भोजनाच्या निमित्ताने एकत्र आल्याने त्याचे वेगवेगवेगळे अर्थ कढले जात आहेत. उत्तर प्रदेशात ब्राह्मण नाराज आहेत, ब्राह्मण विरुद्ध ठाकूर, ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असा संघर्ष सुरू आहे, असे अनेक अर्थ या भोजनामधून काढले जात आहेत.
ही बैठक संध्याकाळी ७ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालली होती. भाजपाच्या ब्राह्मण आमदारांच्या मेजवानीवरून विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून सत्ताधारी भाजपावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नेत्यांनी जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनौमध्ये जाऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयी या दिवंगत नेत्यांच्या पुतळ्यांचं अनावरण करक असकानाच दुसरीकडे या घडामोडी घडल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे हे तिघेही ब्राह्मण समाजातील होते.
एकीकडे या मेजवानीबाबत भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाकडून यापुढे जातिपातीच्या बैठका आयोजित करण्यात येऊ नयेत असा सक्त संदेश देण्यात आला आहे. मात्र या बैठकीत सहभाही झालेल्या नेत्यांकडून ही एक अनौपचारिक बैठक होती, असे स्पष्टीकरण दिलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपामधील ब्राह्मण आमदारांमध्ये नाराजी आहे. तसेत ब्राह्मण नेते आपल्या भविष्याबाबत विचार करत आहेत. तसेच योजना आखण्यासाठी एकत्र येत आहेत, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय राजकारणाचा मुद्दा चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. २०१७ साली योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. तर दुसऱ्या वेळी योगी मुख्यमंत्री बनले तेव्हा बृजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले होते. या निर्णयांचा संदर्भ जोडण्यात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या १२ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या मतदारांकडे कुणी दुर्लक्ष करू शकत नाहीत.