आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:26 IST2023-07-04T16:26:17+5:302023-07-04T16:26:24+5:30
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारी सुरू केली आहे.

आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले
BJP Mission 2024: लोकसभा निवडणुकीसाठी एका वर्षाहून कमी कालावधी उरला आहे, तसेच या वर्षीही अनेक राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने संघटनेत मोठे बदल केले आहेत. आंध्र प्रदेश, पंजाब, झारखंड आणि तेलंगणामध्ये पक्षाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश भाजपचे नेतृत्व डी पुरंदेश्वरी यांच्याकडे, पंजाबचे सुनील जाखड यांच्याकडे, तेलंगणाचे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे आणि झारखंडचे बाबुलाल मरांडी यांच्याके देण्यात आले आहे. याशिवाय, राजेंद्र अतिला यांना निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
रात्री उशिरा पंतप्रधान मोदींच्या बैठकीनंतर या बदलांची चर्चा सुरू झाली होती. अमेरिकेहून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष उपस्थित होते. यानंतर बदलाची चर्चा सुरु झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने प्रचारालाही सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या 9 वर्षांच्या कामाची माहिती देण्यासाठी देशव्यापी प्रचार सभा होत आहेत.
भाजपने प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली
रात्री उशिरा पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सर्व बैठकीनंतर आता प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी 6, 7 आणि 8 जुलै रोजी तीन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व राज्यातील बडे नेते सहभागी होतील.
अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
या वर्षी तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपसाठी सर्व राज्ये महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेशात पक्षाचे सरकार वाचवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे भाजपचे पूर्ण लक्ष राजस्थान, तेलंगणावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशात मोठी सभा घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या मुख्य अजेंडांपैकी एक असलेल्या समान नागरी संहितेचे जोरदार समर्थन केले.