"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:03 IST2025-12-27T13:03:08+5:302025-12-27T13:03:51+5:30
BJP And Mamata Banerjee : भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्येही हिंदू असुरक्षित आहेत, तर मुख्यमंत्री गप्प आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. बांगलादेशच्या मुद्द्याबाबत भाजपा नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, देशाच्या फाळणीपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनांवर पूर्णपणे गप्प आहेत. सरकारही कोणतीही कारवाई करत नाही.
एसआयआरच्या मुद्द्याबाबत भाजपा नेता म्हणाले की, पश्चिम बंगालमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. एसआयआरबाबत सुनावणी सुरू असताना मोठ्या प्रमाणात नावं मतदार यादीतून वगळली जाण्याची अपेक्षा आहे. ओडिशामध्ये बांगलादेशी असल्याच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या एका मजुराच्या हत्येवरही दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडतात हे निंदनीय आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
दिलीप घोष यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणावरही मत व्यक्त केलं. कुलदीप सेंगरच्या जामिनाबद्दल त्यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे आणि तेथील सरकार या प्रकरणात आपली भूमिका बजावेल. यापूर्वी भाजपाने आरोप केला होता की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर आणि भारतीय पुनर्जागरणाचे जनक राजा राममोहन रॉय यांची भूमी हळूहळू पश्चिम बांगलादेशात रूपांतरित होत आहे.
भाजपाच्या बंगाल युनिटने "एक्स" पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ममता बॅनर्जी यांच्या "बंगालीविरोधी राजवटीत" फिरहाद हकीम, जमात-ए-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सिद्दीकुल्लाह चौधरी आणि बाबरी मशिदीचे बांधकाम करणारे हुमायून कबीर हे इस्लामी राज्य ताब्यात घेत आहेत. हे सर्वजण टीएमसीशी संबंधित आहेत. बंगाली भाषा आणि संस्कृतीचा नाश करणं हा आता लपलेला अजेंडा राहिलेला नाही. तो पूर्णपणे उघड आहे."