महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:24 IST2022-06-22T21:23:51+5:302022-06-22T21:24:27+5:30
उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती
शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारणात जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यातच, भाजपच्या ज्येष्ठ आणि फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे,' असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
यावेळी उमा भारती यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार अव्यवहार्य होते. कारण काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊच शकत नाही. ते एक सडलेले फळ होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. एवढा एकच त्यांचा हेतू होता.
उमा भारती म्हणाल्या, 'ही बाळासाहेबांची शिवसेना बिल्कुल नव्हती, ही तर काँग्रेसची B टीम असलेली शिवसेना होती. हे सरकार नक्कीच पडायला हवे. कारण हे सरकार हिंदू विरोधी आणि महिला विरोधी सरकार आहे.' एवढेच नाही, तर उद्धव ठाकरेंवर निशाना साधत, या शिवसेनेने आपले नाव बदलून 'काँग्रेस सेना' ठेवायला हवे, असेही भारती यांनी म्हटले आहे.