"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:02 IST2026-01-03T17:01:15+5:302026-01-03T17:02:14+5:30
Rahul Gandhi : भाजपाचे नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच शाब्दिक चकमक पाहायला मिळते. आता भाजपाचे नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "राहुल गांधी आता 'लीडर ऑफ पर्यटन' झाले आहेत" असा टोला पूनावाला यांनी लगावला. संसद अधिवेशन सुरू असताना बर्लिनमध्ये सुटी साजरी करून परतलेले राहुल गांधी, आता पुन्हा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी कधीही 'वर्क मोड'मध्ये नसतात, त्यांना फक्त सुट्यांमध्ये राहायला आवडतं. आता तर ते कायमस्वरूपी सुटीच्या मूडमध्ये दिसतात. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ते म्हणाले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते देशाचे पंतप्रधान होईपर्यंत सतत 'वर्क मोड'मध्ये आहेत. बिहार निवडणुकीचा दाखला देत पूनावाला म्हणाले की, जेव्हा देशात निवडणुका सुरू होत्या, तेव्हा राहुल गांधी जंगल सफारीचा आनंद लुटत होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतं की, राहुल गांधी हे 'पार्ट टाइम' नेते आहेत. तसेच त्यांनी आपल्या परदेश दौऱ्यात ते कोणाकोणाला भेटतात, हे देशाला सांगायला हवं.
जेजेपी नेते अजय चौटाला आणि समाजवादी पक्षाचे नेते रविदास मेहरोत्रा यांच्या विधानांवरही पूनावाला यांनी भाष्य केलं. भाजपाचा विरोध करता करता काही राजकीय पक्ष आता देश, लोकशाही, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. आधी अजय चौटाला यांनी बांगलादेश, श्रीलंका किंवा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करून हिंसाचार भडकवण्याचं विधान केलं होतं. आता समाजवादी पक्षही तशीच भाषा बोलत आहे. काँग्रेसनेही यापूर्वी भारतात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. याचा अर्थ असा की, जर जनतेने तुम्हाला सत्तेत आणलं नाही, तर तुम्ही संविधान विरोधी बनणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डीएमके सरकारवर निशाणा साधताना भाजपा नेते म्हणाले की, जेव्हा हायकोर्ट दर्ग्याला धार्मिक विधी आणि सण साजरे करण्याची परवानगी देतं, तेव्हा डीएमके सरकार तत्परतेने परवानगी देतं. मात्र, जेव्हा तेच हायकोर्ट हिंदूंना शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पवित्र ठिकाणी दीप प्रज्वलित करण्याची परवानगी देते, तेव्हा डीएमके सरकार त्यांना रोखतं. तिथे पोलीस बंदोबस्त लावला जातो, हिंदू भक्तांना मारहाण केली जाते आणि निकाल देणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.