'सोनिया गांधींनी तिस्तांना 30 लाख रुपये दिले', गुजरात दंगलप्रकरणी भाजपचे काँग्रेसवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 15:06 IST2022-07-16T15:05:52+5:302022-07-16T15:06:06+5:30
"2002 च्या गुजरात दंगलीत काँग्रेसने नरेंद्र मोदींना ज्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्याचे सत्य आता हळू हळू बाहेर येत आहे."

'सोनिया गांधींनी तिस्तांना 30 लाख रुपये दिले', गुजरात दंगलप्रकरणी भाजपचे काँग्रेसवर गंभीर आरोप
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि तीस्ता सेटलवाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पात्रा म्हणाले, गुजरात दंगलीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीस्ता सेटलवाड यांना 30 लाख रुपये दिले होते. शूज, रिसॉर्टमध्ये वाईन... हे तिस्ता सेटलवाड यांचे वास्तव आहे. खरे तर, तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जात एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा झाला आहे. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरूनच तिस्ता यांना गोध्रा घटनेनंतर 30 लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबित पात्रा पत्रकार परिषदेत बोलत होते.
एसआयटीच्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत संबित पात्रा म्हणाले, या षडयंत्रामागे नेमके कोण-कोण लोक होते, हे या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून तीस्ता सेटलवाड आणि इतरांनी गुजरात सरकार अस्थिर करण्याचा कट रचला. पण, अहमद पटेल हे केवळ एक नाव आहे. त्यांची प्रेरक शक्ती त्यांच्या बॉस सोनिया गांधी होत्या. सोनिया गांधी यांनी त्यांचे प्रमुख राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या माध्यमाने गुजरातची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तेच या संपूर्ण कटाचे शिल्पकार होते.
संबित पात्रा म्हणाले, यासंदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की काही लोक षड्यंत्र रचून हा विषय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि चुकीचे तथ्य समोर ठेवत होते. आता या लोकांवरही कायदेशीर कारवाई व्हायरला हवी. 2002 च्या गुजरात दंगलीत काँग्रेसने नरेंद्र मोदींना ज्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्याचे सत्य आता हळू हळू बाहेर येत आहे.
पात्रा म्हणाले, या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे. यात, तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे सहकारी मानवतेने काम करत नव्हते, तर ते राजकीय हेतूने काम करत होते. त्यांचे २ उद्दिष्ट होते. एक म्हणजे, गुजरात मधील तेव्हाचे सरकार अस्थिर करणे आणि दुसरे म्हणजे, निर्दोष लोकांचा यात समावेश करणे. यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे, असे या शपथपत्रात म्हणण्यात आले आहे, असेही पात्रा यांनी म्हटले आहे.