भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल करत शुक्रवारी मोठा आदेश दिला. कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करून आणि लसीकरण (नसबंदी) करून त्यांना परत सोडण्यात यावे. प्रत्येक परिसरात एक निश्चित खाण्याचे ठिकाण असावे. अर्थात कुत्र्यांना कुठेही अन्न देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे प्राणी हक्क कार्यकर्त्या तथा भाजप नेत्या मनेका गांधी यांनी स्वागत केले आहे.
एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना मनेका म्हणाल्या, "या वैज्ञानिक निर्णयामुळे मी अत्यंत आनंदी आहे. कुत्रे चावण्याचे एकमेव कारण, विस्थापन आणि भीती आहे. रेबीजने संक्रमित कुत्र्यांना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
आक्रामक कुत्रा कुठल्या कुत्र्याला म्हटले जावे?-"आक्रमक कुत्रा कुणाला म्हटले जावे, हे न्यायालयाने निश्चित केलेले नाही. याची व्याख्या करणे आवश्यक आहे. निर्धारित खाद्य क्षेत्रे तयार करण्याचा आदेश अत्यंत योग्य आहे. महानगरपालिकेला अशा निर्धारित क्षेत्रांसाठी साइनबोर्ड देखील लावावे लागतील. न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांचा निर्णय संपूर्णदेशासाठी लागू असेल," असेही मनेका गांधी म्हणाल्या.
मनेका पुढे म्हणाल्या, "आदेशानुसार, महानगरपालिकांना योग्य एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) केंद्रे स्थापन करावी लागतील. २५ वर्षांत प्रथमच, सरकारने संसदेत सांगितले आहे की, ते या कार्यक्रमासाठी २,५०० कोटी रुपये देत आहेत."