राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 14:48 IST2018-09-24T14:45:43+5:302018-09-24T14:48:07+5:30

राहुल गांधींसाठी पाकिस्तानमधून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा भाजपाचा आरोप

bjp hits out at congress draws rahul gandhi pakistan link | राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपा

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपा

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपानं टीका केली आहे. राहुल गांधींसाठीपाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या ट्विटचा संदर्भ दिला. 

पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी राहुल गांधींच्या ट्विटचा वापर केल्याचं संबित पात्रा म्हणाले. 'राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करणाऱ्या ट्विटचा आधार घेत आधी पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विट केलं. त्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. मोदी राहुल गांधींना घाबरले आहेत. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील, असं पाकिस्तानचे माजी गृहमंत्री म्हणतात. त्यामुळे राहुल गांधींसाठी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात आहे, हे स्पष्ट होतं,' असं संबित पात्रा म्हणाले. 




याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एका ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख खुजा माणूस असा केला होता, याची आठवण संबित पात्रांनी करुन दिली. 'राहुल गांधींनी पुढे जावं, असं वाटणारे लोक कोण आहेत? राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, असं भ्रष्टाचारी, घराणेशाही मानणाऱ्या, लांगुलचालन करणाऱ्यांना वाटतं,' असं पात्रा पुढे म्हणाले. जे लोक सत्याच्या बाजूनं आहेत, त्या लोकांना मोदी पुढे जावेत असं वाटतं, असं संबित पात्रा यांनी म्हटलं. 

Web Title: bjp hits out at congress draws rahul gandhi pakistan link