प्रतिष्ठेच्या मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने या नेत्याला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:27 IST2025-01-14T16:26:24+5:302025-01-14T16:27:17+5:30
Milkipur Assembly By-Election: भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

प्रतिष्ठेच्या मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने या नेत्याला दिली उमेदवारी
भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. येथे समाजवादी पक्षाने अजित प्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपानेही येथे आपल्या उमेदवारी घोषणा करताना चंद्रभान पासवान यांना उमेदवारी दिली आहे. येथील आमदार अवधेश प्रसाद यांनी लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारंघातून विजयी झाल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अयोध्येचा समावेश होणाऱ्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी येथून सनसनाटी विजय मिळवला होता. तसेच हा निकाल देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला होता. अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर काही महिन्यांतच झालेल्या या पराभवामुळे भाजपावर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यामुळे आता मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल, तर मिल्कीपूरची जागा राखत आपली ताकद दाखवून देण्याचं आव्हान समाजवादी पार्टीसमोर असेल.
मिल्किपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० तारखेपासून सुरू झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी आहे. खरमास असल्याने आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. आता संक्रातीच्या सणासोबतच उत्तरेतील खरमास समाप्त झाल्याने १५ तारखेपासून उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार उतरवलेला नाही. काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर बसपानेही उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिल्कीपूरमध्ये समाजवादी पक्ष आणि भाजपामध्ये थेट लढत होताना दिसेल. तसेच जातीय समिकरणं पाहायची झाल्यास मिल्कीपूरमध्ये पासी विरुद्ध पासी अशी लढत यावेळी पाहायला मिळेल. भाजपा उमेदवार चंद्रभान पासवान हे पासी समाजातील असून, ते रुदौली येथून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. सध्या त्यांची पत्नी सदस्य आहे.