सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 07:43 PM2019-03-12T19:43:52+5:302019-03-12T22:20:59+5:30

2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.

BJP has alliance with 29 parties to retain power | सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे या होऊ घातलेल्या महाआघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे.  2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. तसेच या मित्रपक्षांसाठी आपण जिंकलेल्या जागा सोडण्यापर्यंतचे औदार्य भाजपाकडून दाखवण्यात येत आहे. 

2014 साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये 16 मित्रपक्षांचा समावेश होता. या सर्व पक्षांनी एकत्र येत ती निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाला मित्रपक्षांची तेवढी गरज उरली नव्हती. त्यामुळेच शतप्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपा नेत्यांनी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली होती. पण गेल्या काही काळात बदललेली राजकीय परिस्थिती, काही राज्यात झालेला पराभव यामुळे मित्रपक्षांशी जुळवून घेण्याची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक पक्षांना सामावून घेण्याचा धडाका भाजपाने लावला आहे. सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत छोटे आणि मोठे मिळून 29 पक्ष सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने अगदी मुक्तहस्ते या पक्षांना जागावाटप केले आहे. 

बिहारपासून सुरुवात करायची झाल्यास बिहारमध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी पाच जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्या आहेत. येथे भाजपाची जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सलग पाच वेळा जिंकलेली गिरिडिह लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाने एजेएसयू या मित्रपक्षाला सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युतीची गाठ नव्याने बांधण्यात यश मिळवल्यावर भाजपाने आपल्या खात्यातील दोन अधिकच्या जागाही आपल्या या जुन्या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. या जागांमध्ये पालघरच्या जिंकलेल्या जागेचाही समावेश आहे.  दरम्यान, दक्षिणेत तामिळनाडूमध्येही एआयएडीएमकेच्या रूपात भाजपाला मित्रपक्ष मिळाला आहे. तसेच डीएमडीके हा पक्षही या आघाडीत सहभागी झाला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपावर नाराज असलेल्या मित्रपक्षांची समजूत घालण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. ओमप्रकाश राजभर आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.  

Web Title: BJP has alliance with 29 parties to retain power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.