‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:26 IST2025-08-13T14:22:51+5:302025-08-13T14:26:30+5:30
BJP counterattacks Congress : आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भाजपाने मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे देशभरातील राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात, असा टोला ठाकूर यांनी लगावला.
अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस भारतीय लोकांना एवढं का कमी लेखू इच्छित आहे. भारतीय मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस केवळ घुसखोरांच्या वोट बँकेपुरतीच मर्यादित राहू इच्छित आहे. मतदार याद्यांमधून बनावट मतदारांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या मतदारांचा मताधिकार सुरक्षित राहावा यासाठी मतदार याद्या पुनरीक्षणास (SIR) सुरुवात झाली तर काँग्रेस त्याला विरोध करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात. राहुल गांधी यांनी ‘भयंकर’ समोर आणलं असं काल काँग्रेसचे कुणीतरी नेते म्हणाले. मात्र राहुल गांधी यांनी भयंकर नाही तर ब्लंडर केलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत संशय निर्माण केला. आता पुन्हा एकदा खोटं बोलत आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा उरलेला नाही.
यावेळी अनुराग ठाकूर यांनी काही बनावट मतदारांची उदाहरणंही दिली. ते म्हणाले की, रायबरेली येथील मोहम्मद कैफ खान यांचं बूथ क्रमांक ८३, १५१, २१८ अशा ठिकाणी नाव आहे. तर घर क्रमांक १८९ पत्त्यावर ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. तसेच बंगालमधील डायमंड हार्बर येथे घर क्रमांक ००११, बुथ क्रमांक १०३ लर अनेक धर्माच्या लोकांची नावं नोंदवलेली आहेत. रायबरेलीत एकाच घरामध्ये ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी विचारला.
खऱ्या भारतीय आणि खऱ्या नागरिकांनाच मताधिकार मिळाला पाहिजे. रायबरेलीमध्ये बरेच लोक ३-४ बूथवर मतदान करतात. डायमंड हार्बरमध्ये खुर्शिद आलम हे नाव वारंवार मतदार यादीत येतं. मात्र त्यांच्या वडिलांचं नाव बदललं जातं. एकाच जागी ५२ मतांची नोंद आहे, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.
महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये काँग्रेसने मतदारांची नावं वाढवली जात असल्याचा आरोप केला होता. असे आऱोप करून काँग्रेस पक्ष मतदारांचा अपमान करत आहे. राहुल गांधी आणि ते सादर करत असलेले आकडे खोटे आहेत, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच काँग्रेसने कर्नाटकमध्ये या मुद्द्यावरून आपल्याच नेत्याला पक्षातून बाहेरची वाट दाखवली, अशी टीकाही त्यांनी केली.