भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:35 IST2025-11-15T08:33:34+5:302025-11-15T08:35:40+5:30
Bihar Assembly Election 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने निवडणूक लढविली असली तरी नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील की नाही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, नितीश यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्याची शक्यता कमीच दिसते.

भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची त्सुनामी आली. भाजपने नंबर एकचा पक्ष होऊन विक्रम प्रस्थापित केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयूने जोरदार मुसंडी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने निवडणूक लढविली असली तरी नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील की नाही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, नितीश यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्याची शक्यता कमीच दिसते.
अमित शाह, जे.पी. नड्डा यांनीही मुख्यमंत्री कोण याबाबत संकेत दिलेला नाही. यासंदर्भात जदयूने ट्विट केले की, “नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील.” मात्र, ही पोस्ट एका तासात डीलीट करण्यात आली. परंतु, असे मानले जाते की भाजपने महाराष्ट्रात जे केले ते बिहारमध्ये करू शकणार नाही; कारण त्यांना इतर प्रमुख राज्यांमध्ये आणि केंद्रातही मित्रपक्षांची आवश्यकता आहे.
सत्ताधारी एनडीएला मोठा विजय मिळाला आहे. बिहारमधील एनडीए सरकारला सातत्याने सहकार्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मी आभारी आहे. या विजयासाठी एनडीएतील घटक पक्षांचे नेते चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांच्या सहकार्याने बिहार आणखी प्रगती करेल. देशातील सर्वांत विकसित राज्यांमध्ये त्याचा नक्की समावेश होईल.
- नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांचा ‘पलटू राम’ खेळ आता शक्य नाही
राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, नितीश कुमार नेहमीचा ‘पलटू राम’ खेळ खेळू शकत नाहीत. महाआघाडीला फक्त ३४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयू ८४ जागांसह बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही. उलट, भाजपच एलजेपी, एचएएम आणि आरएलएम यांच्यासोबत सरकार स्थापन करू शकते. घटनात्मकदृष्ट्या, सर्वांत मोठा पक्ष असल्याने भाजपला प्रथम आमंत्रित करावे लागेल.