"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:31 IST2025-12-18T11:30:31+5:302025-12-18T11:31:57+5:30
गेल्या वर्षी शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या बीकानेरच्या अजय गोदाराचा मृत्यू झाला आहे.

"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
गेल्या वर्षी शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या बीकानेरच्या अजय गोदाराचा मृत्यू झाला आहे. अजयचे कुटुंबीय गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्याच्याशी बोलणं होऊ शकले नाही. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी टाहो फोडला आहे. याच दरम्यान अजय गोदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मदत मागत होता. त्याने म्हटलं होतं की, त्याला जबरदस्तीने युक्रेनच्या युद्धात ढकललं आहे.
अजयने व्हिडिओत सांगितलं होतं की, "आम्हाला जबरदस्तीने युद्धासाठी पाठवलं जात आहे, हा माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो." दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याने दावा केला होता की, युक्रेनचं सैन्य त्यांच्यावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करत आहे. या हल्ल्यात त्याचा एक साथीदार मारला गेला, तर दोन जण पळून गेले. अजयने व्हिडिओद्वारे माहिती दिली होती की, इतरही अनेक भारतीय तरुणांची फसवणूक करून रशियन सैन्यात भरती करून युद्धात ढकललं गेलं आहे.
नेमके काय आहे हे प्रकरण?
अजय गोदारा २८ डिसेंबर २०२३ रोजी शिक्षणासाठी रशियाला गेला होता. तिथे त्याला नोकरीचं आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करण्यात आलं. त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तीन महिन्यांच्या ट्रेनिंगचा उल्लेख होता, मात्र कोणत्याही ट्रेनिंगशिवाय त्याला जबरदस्तीने थेट रणांगणात उतरवण्यात आलं. अजयसोबत त्याचे इतरही साथीदार होते, ज्यांना युद्धभूमीवर पाठवण्यात आलं.
पालकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
अजयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला सुरक्षित परत आणण्याची मागणी करत होते. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेटही घेतली होती. मात्र, अजयचा जीव वाचवता आला नाही आणि रशिया-युक्रेन युद्धात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी अजयचा मृतदेह रशियातून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला, तिथून तो बीकानेरला नेण्यात आला. आपल्या मुलाला गमावल्यामुळे पालकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.