आनंदाच्या क्षणी बत्तीगुल! वरात निघण्यापूर्वीच लाईनमनने कापली वीज; नवरदेव संतापला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:31 IST2026-02-20T15:30:55+5:302026-02-20T15:31:48+5:30
शुभम चौहान यांच्या घरी १९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी वरात निघण्याची जय्यत तयारी सुरू होती.

फोटो - आजतक
बिजनौरमधील नूरपूर येथील डायमंड कॉलनीचे रहिवासी शुभम चौहान यांच्या घरी १९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी वरात निघण्याची जय्यत तयारी सुरू होती. घरात डीजे वाजत होता आणि पाहुण्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. याच दरम्यान वीज विभागाचा एक लाईनमन अचानक तिथे पोहोचला आणि कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता खांबावर चढून त्याने वीजपुरवठा खंडित केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नवरदेव शुभमने दिलेल्या माहितीनुसार, त्याचं वीज बिल पूर्ण भरलेलं असून घरात मीटरही लावलेलं आहे. वीज कापल्यामुळे लग्नाच्या सजावटीची लायटिंग आणि डीजे थांबला, ज्यामुळे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला आणि नातेवाईकांसमोर अपमानित व्हावं लागलं. ज्यावेळी वीज कापली गेली, तेव्हा घरात वरात निघण्याची तयारी सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे घरात अंधार पसरला.
शुभमचा असा आरोप आहे की, त्यांना एक दिवसाची सवलतही दिली गेली नाही. आता नातेवाईक या प्रकरणावरून विविध प्रकारच्या चर्चा करत आहेत, ज्यामुळे त्याला सामाजिक स्तरावर लाज वाटत आहे. त्याने वीज विभागाच्या या कारवाईला पूर्णपणे 'मुजोरी'म्हटलं आहे. वीज विभागाच्या या कारवाईनंतर पीडित कुटुंब आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहे.
या प्रकरणावर अधीक्षक अभियंता धर्मराज सिंह यांनी सांगितलं की, हे प्रकरण सध्या त्यांच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यांनी आश्वासन दिलं आहे की, वीज कापण्यामागे नेमकं काय कारण होतं, याची सखोल माहिती घेतली जाईल. अधीक्षक अभियंत्यांनी स्पष्ट केलं की, जर या कारवाईत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दोष आढळला, तर संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.