सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:52 IST2025-05-20T12:51:45+5:302025-05-20T12:52:48+5:30
लग्नानंतर जेव्हा सून सासरच्या घरी पोहोचली आणि सासूला कळलं की, तिला अभ्यासाची आवड आहे, तेव्हा तिने सुनेचा हात धरून तिला शाळेत नेलं

फोटो - ABP News
एका नवविवाहित सुनेनं तिच्या सासूसमोर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नानंतर जेव्हा सून सासरच्या घरी पोहोचली आणि सासूला कळलं की, तिला अभ्यासाची आवड आहे, तेव्हा तिने सुनेचा हात धरून तिला शाळेत नेलं आणि प्रवेश घेतला. सुपौल जिल्ह्यातील छतापूर ब्लॉकमध्ये ही कौतुकास्पद घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कथरा वॉर्ड क्रमांक १३ येथील रहिवासी कविता देवी यांच्या मुलाचा विवाह सोहटा गावातील रहिवासी अरविंद सरदार यांची मुलगी नीतू कुमारी हिच्याशी १४ मे २०२५ रोजी झाला होता. लग्नानंतर नीतूने तिच्या सासूकडे शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या सुनेची ही इच्छा ऐकून कविता देवी यांनी तिला शिकवण्याचा संकल्प केला. मग त्या मुलीला गावातील शाळेत घेऊन गेल्या.
जेव्हा सासू तिच्या सुनेला वर्गात घेऊन आली तेव्हा शिक्षिकेने विचारलं, "तुम्ही सुनेला इथे आणल्यावर आजूबाजूच्या आणि घरातील लोकांनी तुम्हाला तुमच्या सुनेला शिक्षण देऊ नका असं सांगितलं नाही का? तुम्ही तिला किती शिकवणार?" यावर सासू म्हणाली की, जोपर्यंत तिची शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन.
या प्रेरणादायी गोष्टीबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक रमेश कुमार म्हणाले, "जेव्हा महिला स्वतः शिक्षणासाठी पुढाकार घेतात, तेव्हा ते सामाजिक बदलाच्या दिशेने एक मोठे पाऊल असतं." त्यांनी सासूच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि ग्रामीण भागातील शिक्षणाबाबतच्या बदलत्या विचारसरणीचं हे लक्षण असल्याचं सांगितलं.