भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:13 IST2025-05-19T12:13:12+5:302025-05-19T12:13:42+5:30
इन्स्टाग्राम रील्स बनवणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे.

फोटो - आजतक
सोशल मीडियावरील रील्सच्या नादात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कधीकधी लोकांना त्यामुळे आपला जीवही गमवावा लागतो. गावापासून शहरापर्यंत, रील बनवण्याची आवड आता प्रत्येकामध्ये असलेली असते, मग ती महिला असो, पुरुष असो किंवा मुलं असोत. इन्स्टा रिल्सचं हल्ली सर्वांना वेड लागलं आहे. बिहारमधील सुपौलमध्ये इन्स्टाग्राम रील्स बनवणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे.
एका सुनेला रील बनवणं इतकं महागात पडलं की तिला थेट रुग्णालयातच दाखल करावं लागलं. सुनीता देवी असं महिलेचं नाव असून ती एक रील बनवत होती. मात्र सुनेने सोशल मीडियावर रील बनवणं तिच्या सासऱ्यांना अजिबात आवडलं नाही. परंपरा, संस्कृती आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचं म्हणत सासऱ्यांनी सुनेवर काठीने हल्ला केला आणि तिचं डोकं फोडलं.
२६ वर्षीय सुनीता देवी ही करजाइन पोलीस स्टेशन परिसरातील छित मोतीपूर वॉर्ड क्रमांक ३ येथील रहिवासी आहे. सुनीताने तिच्या पतीने सांगितलं म्हणून रविवारच्या व्रताचं एक रील बनवलं. रील पाहिल्यानंतर सासू आणि सासऱ्यांना तिचा प्रचंड राग आला. संतापलेल्या सासऱ्यांनी काठीने आपल्या सुनेला मारहाण करत तिचं डोकं फोडलं.
रक्तबंबाळ अवस्थेत पतीने सुनीताला रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे जखमी सुनीतावर उपचार करण्यात आले. जखमी महिलेने सांगितलं की, रील बनवण्याच्या मुद्द्यावरून तिच्या सासू आणि सासऱ्यांनी तिला मारहाण केली आणि तिचं डोकं फोडलं. महिलेवर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सध्या चौकशी सुरू आहे.