बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:13 IST2025-11-15T13:12:18+5:302025-11-15T13:13:16+5:30
काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत.

बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालाने सर्वच विरोधी पक्षांना जोरदार झटका दिला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएने बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवले आहे. एनडीने १९८ जागा पटकावल्या आहेत. त्यात ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या निवडणुकीत अवघ्या ३३ जागांवर महाआघाडीला समाधान मानावे लागले आहे. परंतु मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष बिहारमध्ये नंबर वन बनला आहे. आरजेडीला सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते बिहारमध्ये पडली आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आरजेडी सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष बनला आहे. आरजेडीला या निवडणुकीत २३ टक्के मते म्हणजेच १ कोटी १५ लाख ४६ हजार ५५ मते मिळाली आहेत. मात्र अवघ्या २५ जागा आरजेडीच्या पारड्यात पडली आहेत. आरजेडीनंतर भाजपाला २०.८ टक्के मते मिळाली आहेत. भाजपाने या निवडणुकीत १ कोटी ८१ हजार १४३ मते घेतली आहेत. त्यानंतर जेडीयूला १९.५ टक्के मते म्हणजेच ९६ लाख ६७ हजार ११८ मते मिळाली आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत.
आरजेडीवर जातीयवादाचा आरोप
आरजेडीने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे. या व्होटबँकेच्या भरवशावर पक्षाने १४४ जागांपैकी ५२ तिकिटे केवळ यादव समाजाला दिल्याने ‘यादव राज’ पुन्हा येणार हा भाजपाचा संदेश सर्व थरापर्यंत गेला. परिणामी बिगर यादव, मागास, अतिमागास जाती आरजेडीपासून दूर गेला. आरजेडीने काँग्रेस, डावे पक्ष व अन्य छोट्या पक्षांना जागावाटपात किंमत दिली नाही. आपला पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे, असे आरजेडीने सतत ठसवल्याने महाआघाडीची एकूण रणनीती विस्कळीत झाली. काँग्रेसने गॅरंटी जाहीरनाम्यावर तर तेजस्वीने सरकारी नोकरभरतीवर भर दिला याने मतदार संभ्रमित झाला. महाआघाडीच्या एकूण प्रचारात तेजस्वीची छायाचित्रेच झळकत होती. त्यात राहुल गांधी किंवा अन्य मित्र पक्षांचे नेते अभावाने आढळत होते.
दरम्यान, तेजस्वी सुरुवातीपासून प्रचार भाषणात आपले वडील लालू प्रसाद यांचा वारसा सांगत होते. ही मोठी राजकीय चूक ठरली. कारण यामुळे भाजपाचे नेते लालू व राबडी देवी यांच्या काळातील गुंडगिरी, खंडणी अशा घटनांची उदाहरणे जागोजागी भाषणात देण्यास मोकळे झाले. गोपालगंज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तेजस्वी हे लालूंनी केलेले पाप लपवत’ असल्याचा आरोप केला. त्यामुळे तेजस्वी यांचा ‘सामाजिक न्यायाचा’ अजेंडा सपशेल अपयशी ठरला.