बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:58 IST2025-11-15T14:55:12+5:302025-11-15T14:58:21+5:30
नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील.

बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
पटना - बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निकालानंतर २ प्रश्न प्रामुख्याने राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एक म्हणजे पुढील मुख्यमंत्री कोण असणार आणि दुसरे नवीन सरकारचा फॉर्म्युला कसा असणार? बिहारमध्ये यावेळी मुख्यमंत्री कुणीही बनेल परंतु कॅबिनेटचा फॉर्म्युला पूर्णपणे बदलावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच ५ पक्षाचे प्रतिनिधित्व असेल. त्याशिवाय भाजपाच्या कोट्यातील मंत्र्यांचीही संख्या कमी असू शकते.
यंदा ६ आमदारावर १ मंत्रिपद
२०२० साली एनडीएला १२६ जागांवर विजय मिळाला होता. ज्यानंतर ३.५ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. बिहारमध्ये जास्तीत जास्त ३६ मंत्रिपदे आहेत. यावेळी एनडीएच्या वाट्याला १९८ जागा आल्या आहेत. या हिशोबाने प्रत्येक ६ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. मागील सरकारमध्ये जेडीयू १३, भाजपाकडे २२ मंत्रिपदे होती. यावेळी नवा फॉर्म्युला बनवला तर जेडीयू १५ आणि भाजपा १६, लोजपा ३ मंत्री बनवू शकतात. त्याशिवाय उपेंद्र कुशवाह आणि हम यांनाही एक मंत्रिपद मिळेल.
खातेवाटपातही यावेळी बदल झाल्याचे दिसून येईल. मागील वेळी भाजपाकडे जास्त खाती होती. भाजपाने २६ खाती घेतली होती. त्यात आता घट होईल. लोजपाला भाजपाच्या कोट्यातून एक मोठे खाते जाऊ शकते. मागील कॅबिनेटवेळी भाजपाकडे अर्थ आणि नियोजन, बांधकाम, महसूल, नगरविकास, उद्योग, आरोग्य, कृषी, विधी विभाग अशी खाती होती. जेडीयूकडे मागील कॅबिनेटमध्ये गृह, इंटेलिजेंस, जल संधारण, ग्रामविकास, शिक्षण यासारखी प्रमुख खाती होती. यावेळी यात खातेबदल होऊ शकतो.
दरम्यान, नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. त्याचप्रकारे अन्य काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. भाजपाकडे ६ आमदारांच्या फॉर्म्युल्यावर १६ मंत्रिपदे येऊ शकतात त्यामुळे आधीच्या ५ मंत्र्यांना हटवावे लागेल. जेडीयूही काही मंत्रिपदात बदल करू शकतात. जेडीयू प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा निवडणूक जिंकलेत. त्यांनाही कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकते.
किती उपमुख्यमंत्री असणार?
नितीश कुमार जेव्हा जेव्हा मजबूत स्थितीत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री ठेवतात. २०२० मध्ये जेव्हा नितीश कुमार कमकुवत होते तेव्हा भाजपाने २ उपमुख्यमंत्री बनवले होते. यावेळी भाजपा आणि नितीश कुमार दोघेही मजबूत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री असतील हा प्रश्न आहे. त्याशिवाय १९ जागा जिंकणाऱ्या लोजपाही उपमुख्यमंत्रिपदावर दावा करणार का हेदेखील काही दिवसांत कळेल.