'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:29 IST2025-10-06T15:25:59+5:302025-10-06T15:29:24+5:30
या मुद्यावरून आता बिहारमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे...

प्रतिकात्मक फोटो...
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पारर्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आज या निवडणुकीसंदर्भात तारखाही जाहीर होणरा आहेत. असे असतानाच, आता 'बुरखा' आणि 'घुंघट'वरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीत, बुरखाधारी महिलांची ओळख मतदार कार्डसोबत जुळवण्याची मागणी केली होती. यानंतर आता नीतीश सरकारमधील ऊसमंत्री आणि भाजप आमदार कृष्णानंदन पासवान यांनी मोतिहारी येथे पत्रकारांशी बोलताना मोठे विधान केले आहे. “आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, चेहऱ्याची पडताळणी करूनच मतदान करावे, असे म्हटले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास, बुरखा चालेल, तर मग घुंघटही चालेल.” असे कष्णानंद पासवान यांनी म्हटले आहे.
"...जेणेकरून योग्य मतदाराला मतदानाचा अधिकार मिळू शकेल"
तत्पूर्वी दिलीप जायसवाल म्हणाले होते, "महिला कर्मचाऱ्यांमार्फत बुरखाधारी महिलांची ओळख मतदार ओलखपत्राशी जुळवावी, जेणेकरून योग्य मतदाराला मतदानाचा अधिकार मिळू शकेल." मात्र, निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबरला संपत आहे. निवडणूक आयोग आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे.
विरोधी पक्ष या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष... -
या मुद्यावरून आता बिहारमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. बुरखा आणि घुंघट यांसारख्या सांस्कृतिक मुद्द्यांवरून होणारी ही चर्चा निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या वादाला जन्म देऊ शकते. आता विरोधी पक्ष या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.