नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:58 IST2025-10-17T11:57:56+5:302025-10-17T11:58:46+5:30
Bihar Elections 2025: निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे.

नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीला एका महिन्यापेक्षाही कमी काळ उरला आहे. या निवडणुकीबाबत अनेक सर्वेक्षणे समोर आली आहेत, ज्यात एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत होईल असे दिसते. अशातच, निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, "बिहार बदलण्यासाठी 10 लोकांपैकी फक्त 3-4 लोकच पुरेसे आहेत. हे 3-4 लोक आम्हाला पाठिंबा देतात. उरलेले लोक म्हणतात, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे जे 3-4 लोक आमच्या सोबत आहेत, तेच बिहार बदलण्याचे काम करतील.'
जेडीयूला किती जागा मिळतील?
'मागील विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) ला 42 जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी ते सध्याच्या तुलनेत अधिक सक्रिय आणि सजग होते. पण आता त्यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांचा प्रभावही कमी झाला आहे. मी एनडीएच्या एकूण जागांचा अंदाज देऊ शकत नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो की, नितीश कुमार यांचा पक्ष 25 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. नितीश कुमार आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. त्यांच्या पक्षाची स्थिती यावेळी आणखी वाईट होईल,' असा दावा पीकेंनी केला आहे.
भाजप-राजदला किती जागा मिळणार?
'भाजपलाही मागील वेळी मिळालेल्या 74-75 जागांपेक्षा कमी जागा मिळतील. म्हणजेच भाजपलाही या निवडणुकीत नुकसान होणार आहे.' तेजस्वी यादव यांच्या राजदबाबत त्यांनी अंदाज व्यक्त केला की, 'या वेळेस जर चिराग पासवानचा फॅक्टर गृहीत धरला नाही, तर राजद फक्त 25 ते 35 जागांमध्येच थांबेल. तर, 'चिराग पासवान यांच्या पक्षाने मागील वेळी कोणतीही तयारी न करता जेडीयूच्या 110 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यामुळे जेडीयू फक्त 42 जागांवर आली होती. या वेळी त्या सर्व 110 जागांवर आमचा जन सुराज पक्ष पूर्ण तयारीने उमेदवार उभे करत आहे,' असेही पीकेंनी सांगितले.