'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:56 IST2025-09-19T11:55:20+5:302025-09-19T11:56:01+5:30
Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपाबाबत एक महत्त्वाची अट घातली आहे. पासवान म्हणाले की, त्यांच्या मनात जागांची संख्या नाही. त्यांना माहिती आहे की, ते किती जागा लढवणार आहेत. किती जागा, यापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे.
१००% स्ट्राईक रेट मिळवण्याचे ध्येय
चिराग पासवान यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लोकसभेप्रमाणेच मला विधानसभेत अशा जागा हव्या आहेत, जिथे मी १००% स्ट्राईक रेट मिळवू शकतो. लोकसभेत माझा स्ट्राईक रेट १००% होता, मला विधानसभेतही १००% साध्य करायचा आहे. एक-दोन इकडे तिकडे माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत, परंतु ज्या जागा १००% जिंकू शकतो, त्या हव्या आहेत. माझा विश्वास आहे की, जागावाटप याच आधारावर असेल.
वारंवार लोकसभा निवडणुकीचा उल्लेख
गेल्या वर्षी (२०२४) झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) पाचपैकी पाच जागा जिंकल्या होत्या. म्हणूनच चिराग अनेकदा १००% स्ट्राइक रेटचा उल्लेख करतात.
एनडीएमध्ये कोण किती जागा जिंकू शकेल?
बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागा आहेत. एनडीएमध्ये पाच पक्ष आहेत आणि ते सर्व शक्य तितक्या जागा लढवू इच्छितात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २४३ पैकी जेडीयू १०२-१०३ जागांवर, भाजप १०१-१०२ जागांवर, चिराग पासवान यांचा पक्ष २५-२८ जागांवर, एचएएम (जीतन राम मांझी यांचा पक्ष) ६-७ जागांवर आणि आरएलएम (उपेंद्र कुशवाहांचा पक्ष) ४-५ जागांवर निवडणूक लढवू शकतो.