बिहारचे निवडणूक निकाल मतचोरीचे प्रतीक, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:40 IST2025-11-15T07:40:25+5:302025-11-15T07:40:44+5:30
Bihar Assembly Election Result: या निवडणूक निकालांचा आम्ही सखोल अभ्यास करणार आहोत. पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन त्याविषयीचे आमची सविस्तर भूमिका लवकरच मांडणार आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे.

बिहारचे निवडणूक निकाल मतचोरीचे प्रतीक, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
बिहारमधील निवडणूक निकाल हे प्रचंड प्रमाणावर झालेल्या मतचोरीचे प्रतीक आहे. त्या राज्यातील जनतेने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही दुर्बल करणाऱ्या शक्तींविरुद्ध काँग्रेसचा लढा यापुढेही सुरूच राहील. या निवडणूक निकालांचा आम्ही सखोल अभ्यास करणार आहोत. पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन त्याविषयीचे आमची सविस्तर भूमिका लवकरच मांडणार आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे.
निष्पक्ष पद्धतीने न झालेल्या निवडणुकांत आम्हाला विजय मिळाला नाही : राहुल गांधी
बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आश्चर्यकारक आहे. निष्पक्ष वातावरणात न झालेल्या निवडणुकांत आम्ही विजय मिळवू शकलो नाही, अशी खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल अभ्यास करणार आहेत. तसेच लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही यापुढे अधिक प्रभावी प्रयत्न करू. इंडिया आघाडीवर विश्वास दर्शविणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही देत असलेला लढा यापुढेही जारी राहील, असेही ते म्हणाले.
यूपीत खेळ चालणार नाही
बिहारमध्ये जो खेळ SIR ने केला आहे, तो पश्चिम बंगाल, तामिळनाडू, युपी आणि इतर ठिकाणी आता होऊ शकणार नाही. कारण या निवडणूक साजिशीचा भांडाफोड झाला आहे. पुढे आम्ही हा खेळ त्यांना खेळू देणार नाही. सीसीटीव्हीप्रमाणेच आमचे ‘पीपीटीव्ही’ म्हणजे ‘पीडीए प्रहरी’ जागरूक राहून भाजपाचे डावपेच धुळीस मिळवतील. भाजप हा पक्ष नाही, तर छळ आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.