बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:53 IST2025-11-14T15:52:32+5:302025-11-14T15:53:17+5:30
Bihar Election result: बिहार निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते.

बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
बिहार विधानसभा निवडणुकीत NDA च्या दणदणीत यशानंतर महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आले आहे. ओबीसी समीकरण साधण्यासोबतच उमेदवार निवडण्यात विनोद तावडेंचा मोठा हात आहे. यामुळे भाजपात त्यांना महासचिव पदापेक्षाही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बिहार निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते. या दोघांनी आखलेल्या आक्रमक आणि अचूक रणनीतीमुळेच भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान प्रबळ केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारमध्ये पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली. प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय तावडे यांच्या रणनीतीचा भाग होता. तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा निवडणुकीत चांगलाच फायदा झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
राजकीय तज्ञांच्या मते, भाजप आपल्या या नव्या 'रणनीतीकाराला' मोठे बक्षीस देणार आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील एखादे मोठे 'पद' किंवा केंद्रातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
बिहारचा मुख्यमंत्री कोण?
NDA च्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तावडे म्हणाले, "आम्ही बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढलो, हे सत्य आहे. परंतु, मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय केवळ दोन पक्ष नव्हे, तर NDA मधील पाचही पक्ष एकत्र बसून घेतील."