Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:25 IST2025-11-14T10:24:35+5:302025-11-14T10:25:45+5:30
बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे पहिल्यांदाच राजकारणात उतरले होते

Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
मुंगेर - बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघाची या निवडणुकीत जोरदार चर्चा होती. हा मतदारसंघ इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे याठिकाणी माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात रंगत आणली.
याठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. अजय सिंह यांची तिकीट कापून इंडियन इंक्लूसिव्ह पक्षाला दिली होती. याठिकाणी IIP ने नवीन चेहऱ्याला संधी देत नरेंद्र तांती यांना मैदानात उतरवले होते. तर जेडीयूचे बंडखोर आणि माजी मंत्री शैलेश कुमार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी सध्या जेडीयू उमेदवार आघाडीवर आहे तर आयआयपीचे उमेदवार नरेंद्र तांती दुसऱ्या नंबरवर आहेत.
बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे पहिल्यांदाच राजकारणात उतरले होते. लांडे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे जमालपूर मतदारसंघातील लढत चर्चेत आली होती. जमालपूर मतदारसंघात यंदा राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. जेडीयूने याठिकाणी माजी मंत्र्यांचे तिकीट कापून नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर नाराज होऊन माजी मंत्री अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे जेडीयूचा पारंपारिक मतदार कुणाच्या बाजूने कौल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. परंतु जेडीयू उमेदवार सध्या या मतदारसंघातून आघाडीवर आहे.
कोण आहेत शिवदीप लांडे?
पोलिस सेवेतून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले मराठमोळे शिवदीप लांडे हे IPS अधिकारी होते. मूळ महाराष्ट्रातील अकोल्याचे शिवदीप लांडे हे २००६ बॅचचे बिहार कॅडरमधील सर्वात लोकप्रिय IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी पटना, अररिया, पूर्णिया आणि मुंगेर येथे कार्यरत असताना गुन्हेगारी, माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली होती. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांना ‘सिंघम’, ‘रॉबिन हुड’ 'दबंग' अशा उपाध्या मिळाल्या. त्यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी नेहमी तत्पर राहून लोकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली. २०१४ साली त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले, त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, त्यानंतर माझे लग्न झाले असं शिवदीप लांडे यांनी सांगितले होते.