बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:14 IST2025-11-16T16:12:13+5:302025-11-16T16:14:00+5:30
Bihar Election Result 2025: बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर NDA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर एनडीएने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि जदयूची एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक सहा आमदारांसाठी एक मंत्रिपद, असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे.
17 नोव्हेंबरला जेडीयूची बैठक
जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा सध्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करत असून, आज किंवा उद्या पाटणा येथे परततील. यानंतर ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतील आणि पुढील रणनती ठरवतील. त्यानंतर उद्या, म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी जेडीयू विधीमंडळ दलाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तसेच, एनडीएचा नेता निवडण्याची प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
घटक पक्षांची दिल्लीवाी
सरकार स्थापनेच्या चर्चेला वेग आला असताना एनडीएच्या घटक पक्षांचे नेते दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटी देत आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आज दिल्लीला पोहोचणार असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतील.
याशिवाय, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा आज दिल्लीला रवाना झाले आहेत. तेही अमित शाहांना भेटून सरकार स्थापनेबाबत चर्चा करणार आहेत. एलजेपी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवानदेखील आज दिल्लीकडे रवाना झाले असून, LJP(R), HAM आणि RLM या पक्षांसोबत संयुक्त बैठकीत मंत्रिमंडळातील सहभागावर चर्चा करणार आहेत.
बिहार निवडणुकीत कोणाला किती जागा?
| पक्ष | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| भाजप | 89 |
| जेडीयू | 85 |
| एलजेपी (रामविलास) | 19 |
| HAM | 5 |
| RLM | 4 |
| महाआघाडी (काँग्रेस+राजद+) | 35 |