बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:25 IST2025-11-14T13:23:26+5:302025-11-14T13:25:32+5:30
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे. कारण नितीशकुमार यांच्या पक्षाशिवायही एनडीए बहुमताकडे जाण्याची शक्यता आहे. जदयूशिवाय एनडीएने ११८ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्तास्थापनेसाठी १२२ जागांची गरज आहे. यामुळे बिहारमध्ये भाजपा नितिशकुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याची रणनिती आखण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहारच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून 'सुशासन बाबू' अशी ओळख असलेले नितीश कुमार हे कोणत्याही आघाडीचे अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि वाढत्या वयामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र वर्चस्व स्थापित करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
१. समान जागांचे समीकरण
२०२० मध्ये जदयूने भाजपपेक्षा जास्त जागा लढवूनही व कमी जिंकूनही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, २०२५ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा वाटून घेतल्या. भाजपने अत्यंत शांतपणे हा राजकीय समतोल साधला आहे. या ‘समान जागा’ सूत्रामागे भाजपचा छुपा अजेंडा आहे: जर जदयूचे संख्याबळ कमी झाले आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल, व मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, याची तयारी ठेवणे हा होता.
२. चिराग पासवान यांची 'घरवापसी'
चिराग पासवान यांच्या लोजपा (राम विलास) पक्षाला NDA मध्ये पुन्हा मानाचे स्थान देणे, हे देखील भाजपच्या धोरणाचा भाग आहे. चिराग यांना २९ जागा देऊन भाजपने दलित आणि युवा मतांना आकर्षित केले आहे. चिराग पासवान यांचे वाढते वजन अप्रत्यक्षपणे नितीश कुमारांचे पक्षांतर्गत महत्त्व कमी करणारे ठरत आहे.
३. नेतृत्वाचा पर्याय खुला
भाजपने निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्पष्टपणे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली आहे. 'डबल-इंजिन सरकार' या घोषणेवर अधिक भर देऊन, भाजपने भविष्यातील नेतृत्वाचा पर्याय खुला ठेवला आहे. निकालांनंतर, भाजप नितीश कुमारांशिवाय सरकार बनवण्याचा किंवा त्यांच्या भूमिकेत मोठा बदल करण्याचा विचार करू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.