'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:50 IST2025-07-09T11:49:58+5:302025-07-09T11:50:28+5:30
Prashant Kishor on Nitish Kumar: 'भाजपला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही.'

'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
Prashant Kishor on Nitish Kumar: जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर नितीश कुमारबिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारमधील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवा आहे, असा दावा पीके यांनी केला आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, 'मी लिहून देतो, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवाय. ज्यांनी लोकांना निराश केले, त्यांना ते पुन्हा मतदान करतील का? ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील का? की ते नवीन पर्याय निवडतील? कोणत्याही परिस्थितीत, नोव्हेंबरनंतर नितीश कुमार निश्चितच मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारला एक नवीन मुख्यमंत्री मिळेल,' असा दावा त्यांनी केला आहे.
मोदी आणि शांहांना नितीश कुमारांची स्थिती माहित नाही का?
एनडीटीव्ही मुलाखतीत पीके यांना विचारण्यात आले की, ते इतक्या विश्वासाने हा दावा कसाकाय करू शकतात? यावर त्यांनी नितीश कुमारांच्या 'मानसिक आणि शारीरिक स्थिती'कडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'संपूर्ण बिहारला माहित आहे की, नितीश कुमार काहीही करण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत नाहीत. जो व्यक्ती स्टेजवर शेजारी बसलेल्या पंतप्रधानांचे नाव विसरतो; ज्याला राष्ट्रगीत वाजल्यावर ते राष्ट्रगीत आहे की, कव्वाली हे माहित नाही... ज्याने वर्षभरात माध्यमांना संबोधित केले नाही. जो व्यक्ती स्वतःची काळजी घेण्याच्या स्थितीत नाही. तो बिहारची काळजी कशी घेईल? हे तुम्हाला आणि मला कळत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळत नाही का?'
भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री का केले?
'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदावर ठेवले आहे. भाजपकडे बिहारमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी किंवा आत्मविश्वास नाही. म्हणूनच, त्यांनी नितीश कुमारांना तिथे बसवले आहे. पण, तुम्ही लिहून ठेवा, यंदा जेडीयूला २५ पेक्षा कमी जागा मिळणार आहेत. निवडणुकीनंतर जेडीयूच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नितीश कुमार यांचे रेटिंग ६०% वरुन १६-१७% पर्यंत खाली आले आहे. जेडीयूकडे कोणताही केडर नाही. त्यांच्याकडे फक्त नितीश कुमार होते आणि आता तेही गेले आहेत. जर असे झाले नाही, तर मी राजकारण सोडेन,' असे त्यांनी स्पष्ट केले.