"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:58 IST2025-11-04T13:54:38+5:302025-11-04T13:58:54+5:30
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या केली. मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून दहशतवादाचा सफाया केला..."

"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
ज्यांनी राज्यात जंगलराज निर्माण केले, ते आता पुन्हा नव्या वेषात येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते दरभंगा येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेला कमळ चिन्हासमोरील बटण दाबून, राज्यात पुन्हा जंगलराज येण्यापासून रोखण्याचे आवाहन केले.
शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दरभंगा येथे एम्स (AIIMS) उभारले गेले. ज्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधी यांचे केंद्रात दहा वर्षं सरकार होते. मात्र त्यांनी दरभंगाच्या विकासासाठी काहीही केले नाही. मात्र मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केले आहेत. तसेच, मिथिला प्रदेशाला नवी गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची तयारीही सुरू असल्याचे ते म्हणाले.
अयोध्येतील राममंदिरासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, "मुघल, इंग्रज, काँग्रेस आणि लालू सर्वांनी मिळून राम मंदिराचे काम रोखले. पण मोदीजी आल्यानंतर, अयोध्येतील मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. हे मंदिर केवळ हिंदूंच्या आस्थेचे केंद्रच नाही, तर भारतीय संस्कृतीचे आणि विश्वासाचे प्रतिक आहे.
दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानलाही थेट दम भरला. ते म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या केली. मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून दहशतवादाचा सफाया केला. जर पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली, तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल.”
तसेच शाह यांनी बिहारमध्ये उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या धर्तीवर डिफेन्स कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केली, ज्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळेल. यामुळे बिहार आता केवळ स्थलांतर होणाऱ्या तरुणांचेच राज्य राहणार नाही, तर देशाच्या संरक्षण आणि उद्योग क्षेत्रातही आपला ठसा उमटवेल.