बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:07 IST2025-10-26T13:06:45+5:302025-10-26T13:07:22+5:30
तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय...

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. यातच, आज राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनीही (रविवार, २६ ऑक्टोबर) मोठी घोषणा केली आहे. महाआघाडीची सत्ता आल्यास राज्यातील पंचायत प्रतिनिधींना पेन्शन (Pension) आणि ५० लाख रुपयांचे विमा कवच (Insurance Cover) दिले जाईल, अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे. ते पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितीश कुमार सरकारवर हल्ला चढवताना तेजस्वी म्हणाले, "बिहार बदलासाठी तयार आहे. गेल्या २० वर्षांपासून राज्यात 'खटारा' सरकार आहे. आम्ही जेथे जात आहोत, तेथे सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी येत आहेत. जनता भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारीने त्रस्त असून, हे सरकार बदलण्यास उत्सुक आहे."
मानधन दुप्पट करणार, लघुउद्योजकांना ५ लाखांची मदत -
तेजस्वी पुढे म्हणाले, "आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल." याशिवाय, "सोनार, न्हावी, लोहार आणि सुतार यांसारख्या पारंपरिक व्यवसायांशी संबंधित लोकांना स्वयंरोजगारासाठी एकरकमी ५ लाख रुपये दिले जातील," असेही ते म्हणाले.
भाजप-नितीश निशाण्यावर -
यावेळी तेजस्वी यादव यांनी, भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "बिहारमध्ये जाणूनबुजून कारखाने (Factories) लागू दिले नाहीत. आपल्या १७ महिन्यांच्या काळात चांगले काम झाले होते, 'चाचाजी पलटले' (नितीश कुमार) नसते तर आणखी काम झाले असते. तसेच, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी, "बिहारच्या जनतेने विद्यमान सरकारला २० वर्षे दिली. आम्ही केवळ २० महिने मागत आहोत," असे म्हणत त्यांनी जनतेला महाआघाडीला संधी देण्याचे आवाहनही केले.