21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:34 IST2025-10-20T19:33:27+5:302025-10-20T19:34:59+5:30
Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे.

21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाला मोठा झटका बसला आहे. राजदचे सासाराम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार सत्येंद्र साह यांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झारखंड पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर झारखंडच्या गढवा पोलीस ठाण्यात 2004 साली नोंदवलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील स्थायी वॉरंट प्रलंबित होते.
सत्येंद्र साह सासाराम उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर झारखंड पोलिसांच्या स्वाधीन करुन गढवा न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
2004 सालचे दरोडा प्रकरण
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे प्रकरण झारखंडच्या गढवा पोलिस ठाण्यातील 2004 मधील दरोड्याशी संबंधित आहे. त्या प्रकरणात सत्येंद्र साह यांच्याविरोधात न्यायालयाने स्थायी वॉरंट जारी केले होते. पोलिसांनी स्पष्ट केले की, “ही कारवाई पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.”
सासारामच्या राजकारणात खळबळ
सत्येंद्र साह यांच्या अटकेनंतर राजदच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी या कारवाईला राजकीय कट म्हटले. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता, तरी अटकेनंतर ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आता या अटकेमुळे पक्षासमोर नवीन उमेदवार निवडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.