"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:48 IST2025-11-14T17:47:11+5:302025-11-14T17:48:23+5:30
BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.

"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. सुरुवातीचे कौल आणि समोर आलेले निकाल यावरून एनडीएची बंपर कामगिरी दिसून येत आहे. राज्यातील २४३ जागांपैकी १९५ ते २०५ जागांवर एनडीए आघाडीवर आहे तर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. याच दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका न्यूज चॅनलसोबत बोलताना रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. मतचोरीच्या राहुल गांधींच्या विधानावर टीका करताना ते म्हणाले, "मी त्यांचं (राहुल गांधी) नाव पॉलिटिकल टूरिस्ट असं ठेवलं आहे. ते आता कुठे टूर करत आहेत आणि त्यांचं सध्याचं लोकेशन काय आहे?"
रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींची तुलना माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याशी केली. ते म्हणाले की, "त्यांची परिस्थिती नरसिंह राव यांच्यासारखी आहे, जे परदेशात खूप दूर बसून भारताच्या लोकशाहीबद्दल विधानं करतात आणि आपल्याला त्या जागेचं लोकेशन शोधावं लागतं. बिहार निवडणुकीच्या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, गंभीर नसाल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही."
"लोकशाही हा एक गंभीर विषय आहे. राहुल गांधी अजूनही परिपक्व नाहीत, जेव्हा ते एक परिपक्व नेते बनतील तेव्हाच देशातील जनता त्यांना स्वीकारेल आणि त्यांना त्यांचा आदर्श मानेल. शब्द आणि कृतीत फारसा फरक नसावा. जर पंतप्रधान मोदी घराणेशाहीविरुद्ध बोलत असतील तर ते त्यांच्या वर्तनात दिसून येतं. जर ते भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतील तर ते त्यांच्या आणि सरकारच्या वर्तनात दिसून येतं. जनता हे पाहते आणि त्यांना हे नीट समजत आहे."