Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:30 IST2025-11-13T14:29:17+5:302025-11-13T14:30:03+5:30
१९८० च्या निवडणुकीचं उदाहरण आहे. या निवडणुकीत ५७.३ टक्के मतदान झाले होते, जे १९७७ च्या ५०.५ टक्के मतदानाहून अधिक होते.

Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
पटना - बिहार निवडणुकीचा निकाल यायला काही तास शिल्लक आहेत. १४ नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व्हेतून एनडीएला १५० ते १७० जागा तर महाआघाडीला १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता दाखवली आहे. तर काही सर्व्हेत एनडीए आणि महाआघाडीत चुरशीची लढत असल्याचे दिसून येते. एकूणच एक्झिट पोलचे अंदाज एनडीएला सुखावणारे असले तरी एक आकडा त्यांची डोकेदुखी वाढवत आहे. हा आकडा म्हणजे बिहारमध्ये वाढलेले मतदान, बिहारमधील यंदाच्या मतदानाच्या टक्केवारीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. १९५२ नंतर आतापर्यंत सर्वात जास्त मतदान यावेळी बिहारमध्ये झाले आहे.
बिहारमध्ये एकूण मतदान ६६.९१ टक्के झाले आहे. २०२० च्या तुलनेने हे मतदान ९ टक्क्यांनी जास्त आहे. जास्तीचे मतदान एनडीएसाठी चिंतेचा विषय आहे. बिहारचा इतिहास पाहिला तर जेव्हा मतदानात वाढ झाली आहे तेव्हा परिवर्तन झाले आहे. त्यामुळेच वाढलेले मतदान सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत असं विरोधक म्हणतात. मागील निवडणुकीचा आकडा पाहिला तर ३ वेळा सरकार बदलली आहेत, जेव्हा ५ टक्के मतदान वाढले होते. १९६७ च्या निवडणुकीत १९६२ निवडणुकीपेक्षा ७ टक्क्यांनी मतदान वाढले. त्याचा परिणाम काँग्रेस सरकार बदलले आणि गैर काँग्रेसचं सरकार स्थापन झाले.
एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही धाकधूक
१९८० च्या निवडणुकीचं उदाहरण आहे. या निवडणुकीत ५७.३ टक्के मतदान झाले होते, जे १९७७ च्या ५०.५ टक्के मतदानाहून अधिक होते. त्यावेळी ७ टक्के मतदान वाढले आणि सत्ता परिवर्तन झाले. १९९० मध्येही हीच स्थिती आली. मतदान ५.७ टक्क्यांनी वाढले आणि सरकार बदलले. त्यामुळेच मतदानात वाढलेली टक्केवारी पाहून एनडीएची धाकधूक वाढली आहे. परंतु महिलांनी या निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत त्यामुळे एनडीएच पुन्हा सत्तेत येईल असा दावा स्थानिक नेते करत आहेत.
पुरुषांपेक्षा ९ टक्के जास्त महिलांनी केले मतदान
दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. बिहारमध्ये एकूण ६६.९ टक्के मतदान झाले, त्यात पुरुषांचा आकडा ६२.८ टक्के इतका आहे. महिलांचे सरासरी मतदान ७१.६ टक्के इतके आहे. महिलांसाठी लागू केलेल्या योजनांमुळे या महिलांनी नितीश कुमार यांच्या पारड्यात मतदान केल्याचं मानले जाते. त्यामुळेच एनडीएला वाढलेल्या मतदानाने त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. परंतु निकालात उलटफेर होणार का याचीही चिंता एनडीएच्या नेत्यांना लागलेली आहे.