“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:48 IST2025-10-25T05:48:52+5:302025-10-25T05:48:52+5:30
‘माई - बहीण मान’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील, ही हमी तेजस्वी यादव यांनी दिली.

“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत बऱ्याच राजकीय राजी - नाराजीनंतर महाआघाडीने गुरुवारी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले. तेजस्वी यांनी शुक्रवारी लगेच प्रचाराची धुरा सांभाळली. पहिल्याच दिवशी तेजस्वी यांनी ५ मतदारसंघांत प्रचार मोहीम सुरू केली असून, तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा पाटण्यात आपल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना तेजस्वी म्हणाले, अफवा काहीही असोत, कोण काय म्हणतो, यावर आम्हाला भाष्य करायचे नाही. जे वचन देऊ ते आम्ही पूर्ण करू. सर्वांना सांगू इच्छितो की, जर तेजस्वी मुख्यमंत्री झाले तर बिहारमधील जनताही मुख्यमंत्री होईल. म्हणजेच जनता केंद्रस्थानी असेल.
भ्रष्टाचारमुक्त राज्य
बिहार गुन्हेगारी व भ्रष्टाचारमुक्त करण्यासह शिक्षण, उत्पन्न, वैद्यकीय उपचार - औषधी आणि सिंचनावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे आश्वासन तेजस्वी यांनी दिले. ज्या कुटुंबात सरकारी नोकऱ्या नाहीत, अशांना नोकऱ्या दिल्या जातील. ‘माई - बहीण मान’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील, ही हमी त्यांनी दिली. बिहार व उत्तर प्रदेशातील स्थितीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका केली.