"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:54 IST2025-11-08T17:51:40+5:302025-11-08T17:54:54+5:30
मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला प्रोत्साहन देते.”

"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बेगूसरायमध्ये मच्छीमारांची भेट घेतली होती. दरम्यान, ते जवळच्याच एका तालावावरही गेले होते. तलावावर गेल्यानंतर, त्यांनी बोटीवरून पाण्यात उडीही मारली होती. यावेळी माजी मंत्री मुकेश सहनी त्यांच्यासोबत जाळेही टाकले होते. कन्हैया कुमार आणि काही मच्छिमारही त्यांच्यासह कमरेपर्यंत गढूळ पाण्यात उतरले होते. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला आहे.
"बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस करतायेत..." -
राहुल गांधींच्या या डुबकीवरून पंतप्रधान मोदींनी थेट निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, "काही 'मोठ-मोठे लोक' आता बिहारमध्ये मासे बघण्यासाठी येत आहेत. पाण्यात डुबकी मारत आहेत. बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस करत आहेत." मोदी बिहारमधील सीतामढी येथे एका रॅलीला संबोधित करत होते.
'हॅण्ड्स अप' नाही, 'स्टार्ट-अप' हवे... -
राहुल गांधींसोबतच पंतप्रधान मोदी यांनी आरजेडी आणि विरोधकांवरही हल्ला चढवला. मोदी म्हणाले, “जर विरोधक सत्तेत आले, तर ते लोकांना ‘कट्टा’ दाखवून घाबरवतील. बिहारला अशी कट्टा, कुशासन आणि भ्रष्टाचाराचे सरकार नको आहे. मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला प्रोत्साहन देते.”
आपल्या सभांमधून जनतेचा स्पष्ट संदेश मिळत आहे की, “बिहारला कट्टा नव्हे, तर विकास हवा आहे,” असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. दरम्यान, निवडणुकीचा दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला पार पडणार आहे.