एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:54 IST2025-11-15T06:53:31+5:302025-11-15T06:54:03+5:30
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे.

एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे.
महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव हे विजयी झाले असले तरी त्यांचा राष्ट्रीय जनता दल आपला करिष्मा दाखवू शकला नाही. निवडणुकीआधी मताधिकार यात्रा काढून वातावरण निर्माण केलेल्या राहुल गांधी यांची जादूही काँग्रेसला तारू शकली नाही. काँग्रेसला दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षही सपशेल अपयशी ठरला.
एनडीएचा स्ट्राइक रेट लक्षणीय
भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचा स्ट्राइक रेट जवळपास ८९ टक्के तर जदयूचा ८५ टक्क्यांच्या आसपास आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी फलदायी ठरली होती. त्याप्रमाणेच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी निवडणुकीआधी सुरू केलेली महिला रोजगार योजना ही एनडीएच्या विजयात निर्णायक ठरली.
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात ‘एसआयआर’वरून राजकीय राळ उठली होती. महाआघाडीने मतचोरी आणि ‘एसआयआर’चा मुद्दा उपस्थित करत एनडीएला लक्ष्य केले. मात्र तो मुद्दा मतदारांना आकर्षित करू शकला नाही.
ज्याप्रमाणे गंगा नदी बिहारमार्गे बंगालमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने पं. बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
राज्यातील जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवत प्रचंड बहुमत दिले आहे. यासाठी मी राज्यातील सर्व मतदारांना वंदन करतो आणि मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
- नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री