पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:01 IST2025-11-15T07:01:22+5:302025-11-15T07:01:59+5:30
Bihar Assembly Election Result:बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
एनडीए : गेमचेंजर ठरलेल्या गोष्टी
- महिलांचा विश्वास : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील १.३ कोटी महिलांना निवडणुकीच्या आधी दिलेली १० हजारांची थेट आर्थिक मदत मतपेटीत मोठ्या प्रमाणात परावर्तित झाली.
-कट्टा अन् जंगलराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘कट्टा, दुन्नाली, रंगदारी’ची आठवण प्रभावी ठरली. राजद आल्यास ‘जंगलराज’ येईल, हा संदेश विशेषतः ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचला.
-गावखेड्यांमध्ये मोफत वीज : गावोगावी १२५ युनिटपर्यंत मोफत वीज योजना एनडीएसाठी हुकमी एक्का ठरला. अनेक कुटुंबांचे वीजबिल शून्यावर आले असल्याने नाराजीला स्थानच उरले नाही.
- पेन्शन वाढ : ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये ४०० वरून ११०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यामुळे ज्येष्ठ मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावरच विश्वास दाखवला.
-गोंधळलेले विरोधक : महाआघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करण्याऐवजी ‘एसआयआर’ मुद्द्यावर प्रचार मोहीम वळवली. निवडणुकीच्या वेळी हा विषय अप्रासंगिक ठरला.
महाआघाडी : पराभवाची कारणे
- यादव राज : राजदने ५२ यादव उमेदवारांना तिकीट दिले. त्यामुळे बिगर-यादव समाजातील मतदारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आणि ‘यादव राज’ अशी महाआघाडीची प्रतिमा निर्माण झाली.
-एकजुटीचा अभाव : राजद-काँग्रेस-डाव्या पक्षांची महाआघाडी असतानाही, तेजस्वी यादव यांची ‘राजद केंद्रित’ भूमिका अडचणीची ठरली. यामुळे महाआघाडीतील मित्रपक्षांची एकजूट दिसली नाही.
-ब्लू प्रिंटच नव्हती : ‘हर घर सरकारी नोकरी’, ‘महिला सशक्तीकरण’ अशा अनेक घोषणा महाआघाडीने केल्या. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची ठोस ब्लू प्रिंट ते मतदारांना देऊ शकले नाहीत.
-मुस्लिम अनुनय : महाआघाडीची मुस्लिम अनुनयाची प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबवण्यात एनडीएला यश आले. त्याचा इतर समाजातील मतदानावर प्रतिकूल परिणाम झाला.
-विसंगती : तेजस्वी यांनी वडील लालू प्रसाद यादव यांचा वारसा सांगितला, मात्र पोस्टर्सवर लालू प्रसाद यांचा फोटो छोटा वापरला. यातून तेजस्वी यांची विसंगत प्रतिमा मतदारांसमोर आली.