नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:26 IST2025-11-07T11:26:02+5:302025-11-07T11:26:32+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान झाले आहे.

नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी सर्वच विक्रम मोडले आहेत. गुरुवारी (6 नोव्हेंबर) झालेल्या मतदानात 18 जिल्यांतील 121 मतदारसंघांमध्ये तब्बल 64.66 टक्के मतदान झाले. हा आकडा 2020 च्या निवडणुकीपेक्षा सुमारे साडेआठ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी अडचणीचे तर ठरणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. याचे कारण म्हणजे, बिहारच्या राजकीय इतिहासात जेव्हा-जेव्हा मतदानात 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली, तेव्हा तेव्हा सत्तांतर घडले आहे.
राजकीय उलथापालथीची चिन्हे?
2020 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 71 जागांवर केवळ 56.1 टक्के मतदान झाले होते. मात्र, या वेळी 121 जागांवर मतदान झाल्याने आकडेवारीने नवीन विक्रम रचला आहे. वाढलेला मतदानाचा टक्का लोकांमधील बदलाच्या इच्छेचे संकेत देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
टक्का वाढला की, सत्ता बदलली...
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण वाढले की, सत्तेतील पक्ष बदलला आहे. 1962 मध्ये 44.5% मतदान झाले होते, तर 1967 मध्ये ते 51.5% झाले होते. म्हणजेच, सुमारे 7% वाढ झाली. त्यावेळी काँग्रेसची सत्ता गेली आणि राज्यात पहिल्यांदाच गैर-काँग्रेस सरकार स्थापन झाले. 1977 मध्येही 50.5% मतदान झाले, तर 1980 मध्ये वाढून 57.3% झाले. म्हणजेच, जवळपास 6.8% ची वाढ झाली. त्या वेळी जनता पक्षाचा पराभव होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती. या पॅटर्नवरून दिसते की, मतदारांचा वाढलेला उत्साह सत्तेच्या विरोधात गेलेला आहे.
बिहारमधील मतदानाचे प्रमाण
| वर्ष | मतदान टक्का |
|---|---|
| 1951-52 | 42.6% |
| 1957 | 43.24% |
| 1962 | 44.47% |
| 1967 | 51.51% |
| 1969 | 52.79% |
| 1972 | 52.79% |
| 2010 | 52.73% |
| 2015 | 56.91% |
| 2020 | 57.29% |
| 2025 (पहिला टप्पा) | 64.66% |
या आकडेवारीतून स्पष्ट दिसते की, बिहारचा मतदार अधिक जागरूक होत आहे. परंतु इतिहास सांगतो की, मतदानाचे प्रमाण जास्त असले की, सत्ताधारी पक्षासाठी संकट वाढते. त्यामुळे या वेळीही नितीश कुमारांसाठी वाढलेला मतदान टक्का किती शुभ ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.