महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:25 IST2025-10-16T13:24:03+5:302025-10-16T13:25:56+5:30
Bihar Assembly Election 2025: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे झाले, तेच आता बिहारमध्ये होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या जागावाटप सूत्रावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय लोक मोर्चा (रालोमो) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की, एनडीएमध्ये काहीही आलबेल नाही. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे. एनडीएमधील पक्षाच्या भविष्यातील भूमिकेवर चर्चा करण्यासाठी रालोमो प्रमुखांनी पाटणा येथील पक्ष कार्यालयात आपत्कालीन बैठकीची घोषणा केली होती. ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. यातच आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे केले, तेच भाजपा आता बिहारमध्ये करणार का, नितीश कुमार यांचा भाजपा करेक्ट कार्यक्रम करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली असून, यात १२ जणांना उमेदवारी दिली आहे. यात लोकगायिका मैथिली ठाकूर व माजी आयपीएस आनंद मिश्रा यांची नावे आहेत. एक दिवसापूर्वीच भाजपची सदस्य झालेल्या मैथिलीला अलीनगरमधून उमेदवारी दिली आहे. यातच आता नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
नितीश कुमारांना भाजपासोबत सरकार चालवण्यात कोणतीही अडचण नाही
जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. राजकारणात सर्व काही निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण २०२० मध्ये मी म्हटले होते की, आमच्याकडे ४३ जागा होत्या आणि भाजपाने ७३ ते ७४ जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर नितीश कुमार यांनी स्वतः भाजपा नेतृत्वाला त्यांचा मुख्यमंत्री बनवण्याची ऑफर दिली होती. आम्ही सरकारमध्ये सहकार्य करू, अशी ग्वाही दिली होती. भाजपाने नितीश कुमारांवर विश्वास दाखवला. त्यानंतर, आम्ही पाच वर्षे एकत्र सरकार चालवले. मी आधीही सांगितले आहे की, नितीश कुमारांना भाजपासोबत सरकार चालवण्यात कोणतीही अडचण नाही. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारने अनेक क्षेत्रांमध्ये विकास साधला आहे. आम्ही राज्याचा वेगाने विकास केला आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने आम्ही विकास पुढे नेत राहू. सरकारच्या पाठिंब्यामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे कोरोना संकटात बिहारच्या विकासाची गती अखंड राहिली. आगामी निवडणुकीत नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील आणि कोणत्याही अंतर्गत खेळीची शक्यता नाही, असे संजय झा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकार असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. परंतु, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यावर भाजपाने दमदार कामगिरी करत १३२ जागा जिंकल्या. यानंतर महायुतीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले. त्यामुळे आता असाच प्रयोग एनडीए बिहारमध्ये करणार का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.