बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 06:59 IST2025-11-09T06:57:14+5:302025-11-09T06:59:41+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे.

बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. दोन्ही तनातन स्थितीमध्ये आहेत, तरी निवडणुकीच्या निकालातून काही स्पष्ट चित्र दिसायला लागली आहेत. एनडीए आणि महाआघाडीत मतदारांनी कोण जिंकणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांना विजयाच्या खुणा दिसत आहेत. बिहार विधानसभेसाठी ६५.०८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. याआधी ते ६४.६८ टक्के इतके जास्त झाले होते.
बिहारच्या निवडणूक इतिहासातील हा मतदानाचा सर्वाधिक आकडा आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीतील ६२.६ टक्के आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीतील ६४.६ टक्क्यांचा विक्रम या वेळी मोडला आहे. २०२० च्या निवडणुकीतील ५७.२९ टक्क्यांच्या तुलनेत यंदा तब्बल ७.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एनडीए याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वावर निर्माण झालेला पुनर्विश्वास मानत आहे. विशेषतः महिला मतदारांचा मोठा सहभाग महत्त्वाचा मानत आहे. नितीशकुमार यांच्या कल्याणकारी योजनांमुळे ही टक्केवारी वाढली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर महाआघाडीच्या मते, ही वाढ बदलाच्या लाटेचे द्योतक असून, बेरोजगारीने त्रस्त तरुणवर्गाने मोठ्या संख्येने मतदान केले आहे. या वर्गाला नोकऱ्या हव्या आहेत. २०२० मध्ये २४३ पैकी १६७मतदारसंघांत महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते.
एनडीए १६०हून अधिक जागा जिंकेल
-पूर्णिया (बिहार) : या विधानसभा निवडणुकीतविरोधी महाआघाडीचा पराभव निश्चित असल्याचे सांगून एनडीए १६०हून अधिक जागा जिंकून बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केला.
- पूर्णिया, कटिहार व सुपोल येथे प्रचारसभा घेत शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षातील हे नेते सीमांचल भाग घुसखोरांचा गड करण्यासाठी सरसावले असल्याचा आरोप त्यांनी केला.
- केंद्र सरकार अवैध प्रवाशांची ओळख पटवून त्यांची नावे मतदारयाद्यांतून काढेल. अशांना देशाबाहेर काढेल, असा इशाराही शाह यांनी दिला.
रविकिशन अन् तेजप्रताप एकत्र
पाटणा : येथील विमानतळावर शुक्रवारी जनशक्ती जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव आणि भाजप खासदार रविकिशन एकत्र दिसले. माध्यमांनी याबाबत विचारले तेव्हा खासदार रविकिशन यांनी 'तेजप्रताप आणि आम्ही भोलेनाथचे भक्त आहोत', असे सांगत अशा भक्तांसाठी भाजपचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले.