बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:08 IST2025-10-28T12:00:14+5:302025-10-28T12:08:38+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच राज्यातील एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापित आघाड्यांऐवजी तिसरा पर्याय उपलब्ध करून देणारे जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे अडचणीत सापडले आहेत.

बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच राज्यातील एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापित आघाड्यांऐवजी तिसरा पर्याय उपलब्ध करून देणारे जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाकडील नोंदींनुसार प्रशांत किशोर यांचं नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यातील मतदार यादीत नोंदवलेलं असल्याचं समोर आलं आहे.
प्रशांत किशोर यांचं नाव कोलकाता येथील १२१, कालीघाट रोड या पत्त्यावर नोंदवण्यात आलेलं आहे. या ठिकाणीच तृणमूल काँग्रेसचं मुख्य कार्यालय आहे. तसेच हा परिसर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्प्रेसमध्ये प्रकाशित झाले आहे.
प्रशांत किशोर यांनी २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम केलं होतं. दरम्यान, प्रशांत किशोर यांचं मतदान केंद्र सेंट हेलेन स्कूल, बी. रानीशंकारी लेन येथे नोंदवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोंअर गावातील मतदार यादीमध्येही प्रशांत किशोर यांच्या नावाची नोंद आहे. हा प्रशांत किशोर यांचा मूळ गाव आहे. हा गावा सासाराम लोकसभा मतदारसंघातील करगहर विधानसभा मतदारसंघात येतो. इथे केंद्र माध्यमिक विद्यालय, कोंअर येथे प्रशांत किशोर यांचं मतदान असल्याची नोंद आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १७ नुसार कुठल्याही व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नोंदवता येत नाही. कलम १८ मध्ये असलेल्या नोंदीनुसार कुठलीही व्यक्ती ही एकाच मतदारसंघात मतदार म्हणून दोन वेळा आपलं नाव नोंदवू शकत नाही. जर मतदाराने आपला पत्ता बदलला तर त्याला फॉर्म ८ भरून जुन्या पत्त्यावरून आपलं नाव हटवावं लागतं.
या प्रकरणी प्रशांत किशोर यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर जनसुराज्य पक्षाच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले की, बंगालमधील निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये मतदार कार्ड तयार केलं होतं. तसेच बंगालमधील कार्ड रद्द करण्यासाटी अर्जही दिला होता. मात्र त्यांचं बंगालच्या यादीतील नाव रद्द झालं की नाही, हे त्यांनी सांगितलं नाही.