कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या रथावर चढण्यापासून रोखले, बिहारमध्ये चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:35 IST2025-07-09T15:35:09+5:302025-07-09T15:35:46+5:30
Bihar Assembly Election 2025: डाव्या पक्षांमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे कन्हैया कुमार हे आता काँग्रेसच्या बिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले आहेत. मात्र आज बिहारमध्ये महाआघाडीने मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाविरोधात पुकारलेल्या बिहार बंद दरम्यान घडलेल्या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या रथावर चढण्यापासून रोखले, बिहारमध्ये चर्चांना उधाण
विद्यापीठामधील राजकारणातून पुढे आलेले युवा नेते कन्हैया कुमार यांनी अल्पावधीत देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओखळ निर्माण केली आहे. सुरुवातीला डाव्या पक्षांमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे कन्हैया कुमार हे आता काँग्रेसच्याबिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले आहेत. मात्र आज बिहारमध्ये महाआघाडीने मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाविरोधात पुकारलेल्या बिहार बंद दरम्यान घडलेल्या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
त्याचं झालं असं की, महाआघाडीने बोलावलेल्या बिहार बंददरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी उभे असलेल्या रथावर चढण्याता प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कन्हैया कुमार यांना रोखले. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कन्हैया कुमार यांना राहुल गांधी असलेल्या रथावर चढण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी रथावर राहुल गांधी यांच्यासह तेजस्वी यादव, दीपांकर भट्टाचार्य, मुकेश सहनी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, कन्हैया कुमार हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असतानाही त्यांना राहुल गांधींसोबत रथावर चढण्यापासून रोखण्यात आल्याच्या घटनेची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामधून हा प्रकार घडला असावा, असा दावा काही जण करत आहेत. तर काही जण सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असावा, असे सांगत आहेत. मात्र घडल्या प्रकाराबद्दल कन्हैया कुमार यांची अधिकृत प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आलेली नाही.
मात्र या संपूर्ण घटनेमुळे बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत असलेल्या महाआघाडीमधील धुसफूस उघड झाली आहे. आता काँग्रेस पुढील काळात बिहारमध्ये महाआघाडी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रयत्न करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.