अल्पवयीन असल्याचे दाखवून हत्याकांडातून सुटले आणि..., प्रशांत किशोर यांचे भाजपाच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:06 IST2025-09-29T19:06:03+5:302025-09-29T19:06:43+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असताना जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

अल्पवयीन असल्याचे दाखवून हत्याकांडातून सुटले आणि..., प्रशांत किशोर यांचे भाजपाच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप
बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असताना जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहारमधीलभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सम्राट चौधरी हे एका हत्याकांडामध्ये आरोपी होते आणि कोर्टात चुकीची कागदपत्रे दाखवून त्यांना अल्पवयीन दाखवून त्यांना या खटल्यातून सोडवण्यात आले, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
सम्राट चौधरी यांच्यावर केलेल्या आरोपाची पुष्टी देताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सम्राट चौधरी यांनी त्यांच्या २०२० च्या निवडणुकीतील शपथपत्रामध्ये त्यांचं वय ५१ वर्षे सांगितलं होतं. त्या हिशोबाने १९९५ मध्ये त्यांचं वय हे २५-२६ वर्षे असलं पाहिजे. मात्र अशा परिस्थितीत त्यांना अल्पवयीन मानून मुक्त करणं न्याय व्यवस्थेसोबत सम्राट चौधरी यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. एवढे गंभीर आरोप होऊनही सम्राट चौधरी हे आज उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, हे प्रकरण सात लोकांच्या हत्येशी संबंधित आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असूनही चुकीचं वय दाखवून सम्राट चौधरी त्या प्रकरणातून सुटले. आरोपी असूनही अशा प्रकरणातून सुटणं न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. जोपर्यंत कुठल्याही आरोपीला कोर्टातून क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत त्याने तुरुंगात राहिले पाहिजे.
१९९५ मध्ये मुंगेर जिह्यातील तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जणांची हत्या झाली होती. कुशवाहा समाजातील ७ लोकांच्या हत्ये प्रकरणी अनेक जणांसोबत सम्राट चौधरी यांच्या नावाचाही आरोपींमध्ये समावेश होता. मात्र कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार कोर्टाने सम्राट चौधरी यांना अल्पवयीन मानून त्यांना दिलाचा दिला होता. मात्र आता प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरी यांच्या मुक्ततेवर प्रशांत किशोर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यानंतर आता सम्राट चौधरी यांनी प्रशांत किशोर यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार होते. तसेच १९९७-९८ मध्ये मला या आरोपांमधून कोर्टातून मुक्त केले होते. प्रशांत किशोर यांच्याकडे कुठलेही मुद्दे उरलेले नाहीत, त्यामुळे आता ते असे खेळ खेळत आहेत, असा टोलाही चौधरी यांनी लगावला.