महादेव ॲप घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर दुबईत ताब्यात, भारतात आणण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 10:01 IST2023-12-27T09:59:39+5:302023-12-27T10:01:33+5:30
महादेव ॲप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

महादेव ॲप घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर दुबईत ताब्यात, भारतात आणण्याची तयारी
महादेव ॲप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. दुबई पोलिसांनी सौरभ चंद्राकरवर पाळत ठेवली आहे. त्याला दुबईतील एका घरात नजरकैदेत ठेवण्यात आले असून सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने मुख्य आरोपी सौरभविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
ईडीच्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि दुसरा प्रवर्तक रवी उप्पल हे महादेव बेटिंग ॲप यूएईमधील केंद्रीकृत कार्यालयातून चालवत होते. यासोबतच मनी लाँड्रिंग आणि हवालाचे व्यवहारही केले जात होते. हा सुमारे ६००० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने आरोपींविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार
सौरभचे दाऊद कनेक्शन
महादेव अॅपबाबत ईडीने धक्कादायक खुलासा केला आहे. महादेव अॅप ऑपरेट करणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल पाकिस्तानमध्ये डी-कंपनीला सपोर्ट करत होते. डी कंपनीच्या सांगण्यावरून सौरभ चंद्राकरने अॅप ऑपरेट करण्यासाठी दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकर याच्यासोबत भागीदारी करून हे अॅप तयार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
भारत सरकारने महादेव बुकसह २२ बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली होती. सरकारने हे सर्व अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. ईडीने केलेल्या विनंतीनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. तपासात ईडीने या अॅप्सचे ऑपरेशन बेकायदेशीर घोषित केले होते.
काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव अॅपमध्ये सामील झाले होते. याद्वारे लोक क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या अॅपचा वापर करू लागले. या घोटाळ्यात बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचीही नावे समोर आली आहेत. याबाबत अनेकांना समन्स पाठवण्यात आले होते. चित्रपट कलाकारांनी या अॅपचे प्रमोशन केले होते. काही लोकांची चौकशीही करण्यात आली.