बिहारची राजधानी पाटणा येथील गोपाल खेमका या प्रसिद्ध व्यावसायिकाची घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्याकांडाचा तपास करून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या तपासामधून काही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. गोपाल खेमका यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार अशोक साव आहे, त्यानेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी दिली आहे.
अशोक साव हा याआधीही अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी राहिलेला आहे. या प्रकरणी मुख्य शूटर उमेश यादवसह इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशोक साव आणि गोपाल खेमका यांच्यामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. दोघांचेही व्यावसायिक हितसंबंध एकमेकांच्या आड येत होते. तसेच कोट्यवधीच्या जमिनीवरून बऱ्याच काळापासून मतभेद सुरू होते. हाच वाद संपुष्टात आणण्यासाठी अशोक साव याने गोपाल खेमका यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने उमेश यादव नावाच्या शूटरला ४ लाख रुपयांची सुपारी दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक साव याने उमेश यादव याला ५० हजार रुपये आगावू दिले होते. तर उर्वरित पैसे हत्या केल्यानंतर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पोलिसांना त्यांच्या गुन्ह्याचा सुगावा लागला. तसेच पोलिसांनी जेव्हा अशोक साव याच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या तेव्हा तिथून जमिनीच्या व्यवहारांसंबंधीची अनेक कागदपत्रे सापडली. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जमिनीच्या व्यवहारांबाबतचं असल्याचं स्पष्ट झालं होतं.