मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती संपली, आता भारताकडे एवढ्या महिन्यांचा साठा; LPG संदर्भातही खास अपडेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:38 IST2026-04-01T17:37:30+5:302026-04-01T17:38:04+5:30
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत.

मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती संपली, आता भारताकडे एवढ्या महिन्यांचा साठा; LPG संदर्भातही खास अपडेट!
मध्य-पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, पेट्रोलियम मंत्रालयाने ही भीती पूर्णपणे फेटाळून लावली आहे. "देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा इंधन साठा उपलब्ध आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, देशांतर्गत ग्राहकांसाठी सिलिंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे तेल कंपन्यांना काही प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा -
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय चढ-उतारांचा भार तेल कंपन्या सोसावा लागत आहे."
गॅस आणि इंधन पुरवठाही सुरळीत -
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "पीएनजी आणि सीएनजीचा १०० टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. ९२ टक्के गॅस बुकिंग ऑनलाइन होत आहे. ८१ टक्के डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे पूर्ण केली जात आहे. काल एकाच दिवसात ६० लाख सिलिंडरचे वितरण करण्यात आले."
महत्वाचे म्हणजे, "विमान इंधनाच्या (ATF) दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही वाढ फार कमी आहे. हवाई प्रवास खिशाला परवडणारा असावा, ही सरकारची प्राथमिकता आहे," असेही मंत्रालयाने म्हटले आहे.